संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारातच फेकले टमाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:18 AM2021-08-26T04:18:34+5:302021-08-26T04:18:34+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठ रोडवरील टमाटा बाजारात बुधवारी सायंकाळी ४७ हजार ३५० क्रेट इतकी टमाट्याची आवक ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठ रोडवरील टमाटा बाजारात बुधवारी सायंकाळी ४७ हजार ३५० क्रेट इतकी टमाट्याची आवक झाली होती. एका क्रेटमध्ये साधारणत : २० किलो टमोटे असतात. लिलाव सुरू झाल्यानंतर अवघे ३० क्रेटपासून बाेलीस सुरुवात केल्याने अनेक शेतकरी संतप्त झाले. सरासरी ७५ रुपये इतकाच दर क्रेटला मिळत असल्यामुळे अवघा दोन-तीन रुपये किलो इतक्या नीचांकी दराने टमाटा विक्री करून गाडीभाडेही सुटणार नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी संतापात टमाटे बाजार समितीच्या आवारातच फेकून देत घरचा रस्ता धरला. टमाट्याला मिळणारा दर पाहता शेतकऱ्यांचा लागवड खर्च तर सोडा दळणवळण खर्चदेखील निघत नसल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यामुळे बाजार समिती आवारात जागोजागी टमाट्याचा खच पडलेला होता.
यावर्षी टमाटा लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याचबरोबर उत्पादनही वाढले आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील टमाटे विक्रीसाठी तयार आहेत. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये टमाट्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. टमाट्यासाठी प्रसिध्द असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत तर ९० ते एक लाख क्रेटस् इतकी आवक आहे.
मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने व्यापारीदेखील टमाटा खरेदीकडे पाठ फिरवीत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने परजिल्ह्यातील बाजारपेठेत टोमॅटो रवाना केला जात नाही . याशिवाय सध्या टमाट्याला उठावही नाही. यामुळे टमाट्याचे दर घसरले आहेत.
कोट-
सध्या टमाट्याला फारसा उठाव नाही. यामुळे टमाट्याचे दर खूपच कमी झाले आहेत. यात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चच काय गाडी भाडेही सुटणे मुस्कील असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. यावर्षी टमाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून एखाद्या दिवशी मालाची आवक खूप वाढते त्याचाही परिणाम दरांवर होत असतो. - मंगेश खलसे, टमाटा व्यापारी