नाराज हरिश्चंद्र चव्हाण व्यासपीठावर आले, परंतु मोदींनी ना बघितले ना करू दिले भाषण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:00 AM2019-04-23T01:00:41+5:302019-04-23T01:01:49+5:30
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने भाजपाच्या व्यासपीठावर पाऊल ठेवले खरे, परंतु मोदींनी त्यांच्याकडे बघितलेही नाही की त्यांना भाषणही करू दिले गेले नाही.
नाशिक : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने भाजपाच्या व्यासपीठावर पाऊल ठेवले खरे, परंतु मोदींनी त्यांच्याकडे बघितलेही नाही की त्यांना भाषणही करू दिले गेले नाही.
तीन वेळा खासदारकीची हॅट्ट्रिक करूनही भाजपाने यंदा दिंडोरी मतदारसंघात चव्हाण यांचे तिकीट कापले आणि आयारामांना संधी दिली. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यानंतर ते भाजपाच्या प्रचारात कुठेच नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर त्यांनीही आपला राग भाजपावर नसून व्यक्तीवर आहे, असे सांगितले होते. चव्हाण यांना पंतप्रधानांच्या सभेचे निमंत्रण नव्हते, मात्र नंतर ते देण्यात आले. त्यानुसार सोमवारी (दि.२२) ते सभेच्या ठिकाणी व्यासपीठावर आले होते. परंतु पक्षाचे व्यासपीठावरील काही नेत्यांनी त्यांच्याशी अंतर राखणेच पसंत केले. मोदी यांच्या आगमनाआधी अनेक आमदारांनी मनोगत व्यक्त केले. परंतु दिंडोरी मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांना बोलूही दिले गेले नाही. अहमदनगर येथे किमान खासदार दिलीप गांधी यांना बोलताना अडथळे आणण्यात आले होते, परंतु येथे तीही संधी दिली नाही.
व्यासपीठावर मोदी आल्यानंतर त्यांनी नाशिकच्या खासदारांशी औपचारिक चर्चा केली, परंतु चव्हाण यांच्याशी मात्र ते बोलले नाहीत. त्यामुळे एकूणच या परिस्थितीत चव्हाण काय भूमिका घेतात याकडे राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागून आहे.