संतप्त ग्रामस्थांनी काढला मोर्चा
By Admin | Published: May 8, 2017 12:43 AM2017-05-08T00:43:09+5:302017-05-08T00:43:20+5:30
सप्तशृंगगड : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील ट्रस्टच्या व्यवस्थापकाच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या ग्रामस्थांनी संतप्त होऊन ट्रस्टच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सप्तशृंगगड : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या व्यवस्थापकाच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या ग्रामस्थांनी संतप्त होऊन व्यवस्थापकाची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी ट्रस्टच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
येथील कर्मचाऱ्यांमार्फत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी माकपातर्फे ट्रस्टवर मोर्चा काढणे, कर्मचाऱ्यांना त्रास देणे यासाठी ट्रस्ट गाजत आहे तसेच भाविकांकडूनही आरोप प्रत्यारोप होत असतानाच आज सप्तशृंगगडावरील सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला.
यावेळी ट्रस्टच्या विश्वस्तांना ग्रामस्थांनी घेराव घालून आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्या अशा कडक शब्दात जाब विचारला. सप्तशृंगगडावरील सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या कारभाराबाबत न्यासाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी वेगवेगळ्या कारणांनी नाराजी व्यक्त करीत आहे. ट्रस्ट ग्रामस्थांना विश्वासात न घेता कामे करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी कोपरगाव येथील नगरसेवक राजेंद्र पाठक यांनी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे हे मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप केला होता. याबाबत पाठक यांनी वृत्तपत्रात दहातोंडेंविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते.प्रसिध्द झालेले वृत्त दहातोंडे यांनी सोशल मीडियावर टाकल. ेयात पाठक यांच्या विरुद्ध त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच शिरपूर (धुळे) येथील भाविक चौधरी नामक व्यक्तीमार्फत व्यवस्थापकांनी गावाची बदनामी होईल असे वृत्त प्रसिद्ध केले. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ,ज्येष्ठ नागरिकांसह,महिला व पुरूषांनी ट्रस्टच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी येथे उपस्थित असलेले ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे व राजेंद्र सूर्यवंशी यांना सर्व त्रस्त ग्रामस्थांनी जाब विचारला. आणि उन्मत्त झालेल्या व्यवस्थापकाची हकालपट्टी करण्यात यावी तसेच ट्रस्ट बरोबर गावाचीदेखील बदनामी होत असल्याचे आरोप सांगितले. विश्वस्तच व्यवस्थापकाला पाठीशी घालत असल्याचाही आरोप काही ग्रामस्थांनी केला.
शिरपूर येथील ज्या व्यक्तीने गावाची बदनामी होईल असे वृत्त प्रसिद्ध केले त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. यावेळी राजेश गवळी, गणेश बर्डे, उपसरपंच गिरीश गवळी, राधेश्याम दुबे, बाबूराव गवळी, विजय दुबे, संदीप बेनके, अजय दुबे, रामप्रसाद बत्तासे, योगेश कदम, राजेंद्र वाघ, ईश्वर कदम, विनायक दुबे, रमेश पवार, अर्जुन सूर्यवंशी, रमेश गवळी, ग्रामस्थ निर्मल डांगे, दीपक जोरवरकर, सागर बत्तासे, रामप्रसाद बत्तासे,साई बेनके, नवनाथ बेनके, अनिल सताळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.