जनावरांचा चारा; पाण्याचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:25 AM2018-04-28T00:25:15+5:302018-04-28T00:25:42+5:30
उन्हाच्या तडाख्याने पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडेनासा झाला असून, दुपारीच्या वेळी पशु-पक्षी एकांतात झाडाच्या सावलीत बसलेले दिसून येत आहेत. मार्च महिन्यापासून सूर्यनारायण सकाळपासूनच आग ओकू लागल्याने शेतकामासह मानवी जीवनावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. उन्हाची वाढती तीव्रता कमी होत नसल्याने शेततळी, बोअरवेल, पाझर बंधारे, केटीवेअर, विहिरींचा तळ उघडा पडू लागला आहे
वरखेडा : उन्हाच्या तडाख्याने पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडेनासा झाला असून, दुपारीच्या वेळी पशु-पक्षी एकांतात झाडाच्या सावलीत बसलेले दिसून येत आहेत. मार्च महिन्यापासून सूर्यनारायण सकाळपासूनच आग ओकू लागल्याने शेतकामासह मानवी जीवनावरही त्याचा मोठा परिणाम झालाआहे. उन्हाची वाढती तीव्रता कमी होत नसल्याने शेततळी, बोअरवेल, पाझर बंधारे, केटीवेअर, विहिरींचा तळ उघडा पडू लागला आहे. यावर्षी पावसाळा चांगला होता यामुळे यंदा उन्हाची तीव्रता कमी जाणवेल, असे अंदाज वर्तविला जात असतानाच पारा ४१ अंशावर जाऊन पोहोचल्याने खेड्यापाड्यांतील परिसरात भीषण चाराटंचाई व पाणीटंचाईचे सावट एप्रिलमध्येच ओढवले आहे. याशिवाय काही भागात जमिनीची पाण्याची पातळी कमी होऊनविहिरींनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच तळ गाठला आहे. यावर्षी झालेल्या पावसामुळे मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न यावर्षी सुटेल, असे वाटत असतानाच एप्रिलमध्येच चारा व पाणीटंचाईची कमतरता जाणवत असल्याने मे महिन्यात किती भयावह परिस्थिती निर्माण होईल याची धास्ती शेतकरीवर्गाला पडू लागली आहे. खेड्यापाड्यांवरील विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केल्याने जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न गंभीर उभा राहिला आहे तर काही शेतकरी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून बोअरवेल करतानाचे चित्र दिसत आहे. पाण्याच्या शोधात पशुपक्ष्यांची भटकंती वाढली आहे.
दिंडोरी : पारा ४१ अंशांवर
दिंडोरी तालुक्यात तपमानाचा पारा ४१ अंशावर गेल्याने अंगाची लाही लाही होत आहे. यातच उन्हाचा तडाखा वाढल्याने घामाच्या धारांनी नागरिकांबरोबरच पशुपक्ष्यांनाही असह्य होत आहे. सध्या लग्नसराई असल्याने गावात दररोज एकतरी लग्न राहत असल्याने लग्नाची धावपळ होत आहे. पाळीव प्राणी तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव नसल्याने जनावरांना चारा विकत कसा घ्यायचा, असा प्रश्न शेतकरीवर्गाला पडला आहे. पाण्यासाठी थंडाव्यासाठी प्राणिमात्रांची धावपळ सुरू असते. पाण्याच्या ठिकाणी किंवा झाडाखाली पशुपक्षी दुपारच्या वेळी ठाण मांडत आहेत.