जनावरे चोरी करणाऱ्या संशयिताला वाहनासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:15 AM2021-09-23T04:15:38+5:302021-09-23T04:15:38+5:30
इगतपुरी : मुक्या जनावरांना इंजेक्शन देत बेशुद्ध करत गोवंश चोरी करणाऱ्या टोळीतील एका संशयिताला इगतपुरी पोलिसांनी वाहनासह अटक केली ...
इगतपुरी : मुक्या जनावरांना इंजेक्शन देत बेशुद्ध करत गोवंश चोरी करणाऱ्या टोळीतील एका संशयिताला इगतपुरी पोलिसांनी वाहनासह अटक केली असून, बाकीचे पाचजण फरार झाले आहेत. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश चोरीच्या काही घटना यापूर्वी इगतपुरी परिसरात घडल्या होत्या. त्यातील काही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करून बऱ्याच दिवसांपासून चोरट्यांच्या मागावर होते. मात्र चोरांचा तपास लागत नव्हता. रविवारी मध्यरात्रीच्या वेळेस इगतपुरीतील पवार चाळीतील युवक घरी येत असताना त्यांना काही इसम विपश्यना केंद्र पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्कॉर्पिओ गाडी घेऊन उभे असल्याचे दिसले. गाडीच्या बाजूस गाय मूर्च्छित अवस्थेत पडलेली दिसली. त्यांना संशय आल्याने त्यांनी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या इगतपुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले व त्यांना घेरायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोलिसांवर हल्ला चढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पळून जात असताना त्यांच्या महिंद्रा स्कार्पिओचे (क्र. एमएच ०३, झेड ८३०३) चाक फसले. पोलिसांनी व युवकांनी गाडीच्या दिशेने धाव घेतली, मात्र अंधाराचा फायदा घेऊन गाडीतील पाच जण पळून यशस्वी झाले, तर संशयित आबिद मुनीर शेख (३२, रा. भिवंडी) यास पकडले. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या चारचाकी स्कॉर्पिओ वाहनात इंजेक्शन, गुंगीचे औषधाची बाटली आढळली असून, बिना नंबरप्लेटची होंडा डियो दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीस पथकात पोलीस निरीक्षक वसंत पथवे, पोलीस उपनिरीक्षक दिवटे, सचिन देसले, विजय रुद्रे, भगरे, शिवाजी लोहरे, मुकेश महिरे, संदीप शिंदे, व होमगार्ड पथकाचे सचिन चौरे, मोहन अडोले, संतोष सोनवणे, शिवाजी बऱ्हे यांचा सहभाग होता.
210921\35271725-img-20210921-wa0031.jpg
इगतपुरी येथून गायी चोरी करण्यात वापरलेली वाहन