जनावरे चोरणाऱ्यांची पोलिसांवर चाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:16+5:302021-06-03T04:12:16+5:30
जनावरे चोरणारी टोळी एका काळ्या रंगाच्या वाहनातून अमृतधाम लिंकरोडवरून जात असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून रात्रीची गस्त घालणाऱ्या पंचवटी गुन्हे ...
जनावरे चोरणारी टोळी एका काळ्या रंगाच्या वाहनातून अमृतधाम लिंकरोडवरून जात असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून रात्रीची गस्त घालणाऱ्या पंचवटी गुन्हे शोध पथकाला मिळाली. पथकाने तत्काळ मंडलिक मळ्याजवळ सापळा रचून संशयित वाहन थांबविण्यासाठी आपले वाहन रस्त्यात उभे केले. मात्र टोळीच्या स्कॉर्पिओ चालकाला संशय आल्याने त्याने स्कार्पिओ (एमएच ०२ एनए ७७८४) भरधाव चालवून या पथकातील कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर वाहन घालत शासकीय वाहनाला (एमएच १५ ईए ००४७) जोरदार धडक दिली. यानंतर चालकाने वाहनासह मुंबईच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच वाहनाने पुन्हा पाठलाग सुरू केला आणि तिघा चोरांना पकडले; मात्र चालक मुल्ला खान हा फरार झाला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---इन्फो---
या चोरट्यांना ठोकल्या बेड्या
पोलिसांनी पकडलेल्या संशयितांमध्ये सराज युसुफ काझी (२४, रा. मुल्ला चाळ, कल्याणरोड, ठाणे), इरफान रमजान शेख (२३, रा. भिवंडी, जि. ठाणे), दिलशाद समशोद्दीन अन्सारी (३०, रा. भिवंडी, जि.ठाणे), मुल्ला खान (३८, रा. अमृतनगर, मुंब्रा, जि. ठाणे) यांचा समावेश आहे. याच टोळीने या घटनेच्या काही वेळापूर्वी पंचवटीतीलच अशवमेघ नगरमध्ये गायीला गुंगीचे इंजेक्शन देऊन चोरण्याचा प्रयत्न केला होता असे उघडकीस आले आहे. गाय मालकाच्या ही बाब लक्षात येताच या संशयितांनी धूम ठोकली होती.