पशुसखी संकल्पना राज्यभर राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:18 AM2021-08-12T04:18:02+5:302021-08-12T04:18:02+5:30
सिन्नर : शेळी हा सामान्य गरीब शेतकऱ्यांचा खरा आधार असून, शेळीपालनात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी युवा मित्रची पशुसखी ही संकल्पना ...
सिन्नर : शेळी हा सामान्य गरीब शेतकऱ्यांचा खरा आधार असून, शेळीपालनात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी युवा मित्रची पशुसखी ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ही संकल्पना राबवण्यात येईल. त्यासाठीचा अभ्यासक्रम शासनामार्फत प्रमाणित करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी केली.
युवामित्र संस्थेच्या वतीने आठ हजार शेळी पशुपालकांना प्रशिक्षण व प्रोत्साहन दिले जाते. त्याचाच भाग म्हणून दरवर्षी उत्कृष्ट शेळी, करडे आणि शेळी पालन स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ क्रांतिदिनी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला.
व्यासपीठावर पशुसंवर्धन विभाग पुणेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. डी. परकाळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. शशांक कांबळे, नाशिकचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. बी. नरोडे, जि. प.चे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. डी. गर्जे, पद्मभूषण देशपांडे, प्रा. डॉ. विष्णू नरवडे, एस. पी. पाटील, युवा नेते उदय सांगळे, युवामित्र संस्थेच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
--------------------
युवामित्रसोबत चळवळ उभी करणार
राज्यात शेळीपालन व दुग्धव्यवसाय चळवळ जोमात उभी राहिली तर त्याचे श्रेय मंत्री सुनील केदार यांना जाईल. त्यांनी यासंदर्भातील जबाबदारी टाकली तर युवामित्रच्या कार्यकारी संचालक मनीषा पोटे यांना सोबत घेऊन मोठे काम उभे करू असे आश्वासन आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.
--------------------
स्पर्धेतील विजेत्या महिला
या पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या महिलेस एक गाभण शेळी व सन्मानचिन्ह, द्वितीय
क्रमांकास ६ ते ८ महिन्याची शेळी, गांडूळखत युनिट व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास एक शेळी, मुरघास बॅग व सन्मानचिन्ह, सर्वोत्कृष्ट शेळीपालक महिलेस एक गाभण शेळी, गांडूळखत युनिट, मुरघासबॅग व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट शेळी : ज्योती मच्छिंद्र हगवणे (घोरवड) प्रथम, गंगुबाई विठ्ठल फोडसे (ठाणगाव) द्वितीय तर रुक्मिणी गंगाधर गांगुर्डे (ठाणगाव) तृतीय.
उत्कृष्ट करडे : अनिता थोरात (पंचाळे) प्रथम, सुनीता अविनाश सुके (देवपूर) द्वितीय, लीलाबाई एकनाथ गवळी तृतीय. उत्कृष्ट लागवडीचा बोकड : साळूबाई कचरू कातोरे (ठाणगाव) प्रथम, मुक्ता लक्ष्मण बोगीर (पाडळी) द्वितीय, रोहिणी भारत गांजवे-तृतीय. उत्कृष्ट गोठा : विजया शांताराम आव्हाड (दापूर) प्रथम, शैला सोमनाथ राउत (पंचाळे) द्वितीय तर अलका संपत सानप (निमगाव सिन्नर) तृतीय.
फोटो ओळी : सिन्नर येथील युवा मित्र संस्थेच्यावतीने उत्कृष्ट शेळी, करडे आणि शेळीपालन स्पर्धेतील विजेत्यांना राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे, युवामित्र संस्थेच्या कार्यकारी संचालक मनीषा पोटे यांच्यासह विजेते. (१० सिन्नर २)
100821\10nsk_13_10082021_13.jpg
१० सिन्नर २