जागोजागी टोमॅटोचा खच अन् पिकांत सोडली जनावरे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:19 AM2021-09-08T04:19:07+5:302021-09-08T04:19:07+5:30
ग्राऊंड रिपोर्ट/येवला सुयोग जोशी लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोसळलेले भाजीपाल्याचे दर, वाया गेलेला लाखो रुपयांचा खर्च अन् वातावरणाचा ...
ग्राऊंड रिपोर्ट/येवला
सुयोग जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोसळलेले भाजीपाल्याचे दर, वाया गेलेला लाखो रुपयांचा खर्च अन् वातावरणाचा बसलेला फटका यामुळे येवला तालुक्यातील बळीराजावर चिंतेचे सावट पसरले आहे. उत्पादित केलेल्या कोणत्याच शेतमालास दर मिळत नसल्याने उभी पिके तोडण्यात येत असून, ठाणगाव, आंबेवाडीत तर पिकांमध्ये जनावरे सोडण्यात आली आहेत. बदलत्या हवामानाने चाळीत साठवून ठेवलेला कांदाही सडून खराब होत आहे. त्यातच आता कांद्याचे दरही कोसळू लागल्याने शेतकऱ्यांच्या संकटात आणखीनच भर पडली आहे.
टोमॅटो पिकासाठी एकरी सव्वा ते दीड लाखांपर्यंत खर्च करूनही पदरात कवडीही पडत नसल्याने संतप्त झालेल्या येवला तालुक्यातील आंबेवाडी, बाळापूर येथील शेतकरी संजय कोल्हे या शेतकऱ्याने आपल्या टोमॅटोच्या उभ्या पिकात शेळ्या व जनावरे सोडून संताप व्यक्त केला आहे. तर फकीरा बोराडे या शेतकऱ्याने मजुरांकरवी टोमॅटो पीक कापून टाकले आहे. असेच विदारक चित्र सध्या संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळत आहे.
इन्फो...
कधी ओला, कधी कोरडा दुष्काळ
गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरीत नियोजनबद्ध शेती करण्यास सुरुवात केली. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी वर्ग नियोजन करीत शेतात भाजीपाला व इतर पिके घेत आहे. मात्र, पिकविलेल्या पिकाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.
कोट...
गेल्या वर्षी भाजीपाला पिकाचे चांगले उत्पादन झाले होते. यंदा मात्र तोटाच तोटा झाला. टोमॅटो पिकासाठी एकरी सव्वा ते दीड लाखापर्यंत खर्च करूनही पदरात कवडीही पडत नाही.
- संजय कोल्हे, आंबेवाडी, बाळापूर (येवला)
(फोटो मेलने पाठविले आहेत.)
येवला तालुक्यातील धुळगाव येथे चाळीत खराब झालेला कांदा फावड्याने फेकून देताना शेतकरी, तर दुसऱ्या छायाचित्रात आंबेवाडी येथे टोमॅटोच्या पिकात चरण्यासाठी सोडलेल्या बकऱ्या. (०७ पाटोदा १/२/३).