‘अंनिस’तर्फे संतप्त कार्यकर्त्यांचा मोर्चा
By admin | Published: August 21, 2016 10:43 PM2016-08-21T22:43:08+5:302016-08-21T22:56:32+5:30
येवला : तीन वर्षे होऊनही दाभोलकरांचे खुनी फरारच
येवला : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्त्या होऊन तीन वर्षे उलटली तरी त्याचे खुनी शोधण्यास पोलीस यंत्रणेला यश मिळाले नसून, येवल्यातील अंनिसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सरकारी अनास्था आणि पोलिसांची निष्क्रियतेविरोधात शांततामार्गाने निषेध करीत मोर्चा काढला व येवल्याचे तहसीलदार शरद मंडलिक यांना निवेदन देण्यात आले. शिफारशी वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन तहसीलदार शरद मंडलिक यांनी मोर्चाकऱ्यांना दिले.
मोर्चाचे संयोजक आणि अंनिस येवला शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना प्रतिगामी शक्तीवर कडाडून हल्ला केला. महात्मा गांधींपासून डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरेपर्यंत खुनी हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध, धिक्कारच नव्हे तर नायनाट करण्याचे आव्हान आज पुरोगामी शक्तीपुढे असल्याचे प्रतिपादन कोकाटे यांनी केले. यावेळी अंनिसचे येवला शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अजय विभांडिक, सुधाताई पाटील, नारायण डोखे, समीर देशमुख, दिनकर दाणे आदिंनी घटनेचा निषेध करत भाषणे केली. या मोर्चास बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब जगताप, नवनाथ शिंदे, रामनाथ पाटील, प्रा. एस.व्ही, निकुंभ, दौलतराव सुरासे, बबन कोकाटे, शिवाजी निमसे, भाऊसाहेब खराटे, नानासाहेब कोकाटे, अमोल सोनवने, सुजित बारे, बाबासाहेब कोकाटे, आदि कार्यकर्ते उपस्थीत होते. (वार्ताहर)