अंजनेरी बीजारोपणाचा गिधाडांना धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:08 AM2018-08-19T00:08:39+5:302018-08-19T00:14:29+5:30
अंजनेरी व ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा मार्गावरील डोंगरावर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने विविध प्रकारच्या वृक्षांचे लाखोंच्या संख्येने बीजारोपण करण्यास वनखात्याने हरकत घेतली असून, सध्या गिधाडांचा प्रजनन काळ सुरू असल्याने हेलिकॉप्टरमधून बिजारोपणाचे गोळे (सीड बॉम्ब) डोंगर परिसरात सोडल्यास गिधाडांच्या अंड्यांना धोका निर्माण होण्याबरोबरच हेलिकॉप्टरच्या आवाजाने गिधाडांच्या अन्यत्र स्थलांतराची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
नाशिक : अंजनेरी व ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा मार्गावरील डोंगरावर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने विविध प्रकारच्या वृक्षांचे लाखोंच्या संख्येने बीजारोपण करण्यास वनखात्याने हरकत घेतली असून, सध्या गिधाडांचा प्रजनन काळ सुरू असल्याने हेलिकॉप्टरमधून बिजारोपणाचे गोळे (सीड बॉम्ब) डोंगर परिसरात सोडल्यास गिधाडांच्या अंड्यांना धोका निर्माण होण्याबरोबरच हेलिकॉप्टरच्या आवाजाने गिधाडांच्या अन्यत्र स्थलांतराची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी सुरुवात होणाऱ्या या उपक्रमाला खीळ बसली असून, त्याचबरोबर सामाजिक कार्याआड शुल्क आकारून हेलिकॉप्टरची सैर घडविण्याच्या व्यावसायिक पर्यटनालाही परवानगी नाकारण्यात आली आहे.
राष्टÑवादी युवक कॉँग्रेस व कला चिल्ड्रन अकादमीच्या वतीने १९ ते २१ आॅगस्ट या तीन दिवसांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले होते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे निसर्गाचे जतन व पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी अंजनेरी पर्वत, ब्रह्मगिरी परिसरातील जंगलात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने विविध प्रकारच्या दहा देशी प्रजातींच्या सुमारे १२ लाख बिया टाकण्यात येणार होत्या. यासाठी औरंगाबादच्या वरद एव्हिएशनने हेलिकॉप्टरची सुविधा देण्याचे तर सपकाळ नॉलेज हब येथून हेलिकॉप्टरचे लॅडिंग व टेकआॅपची तयारी करण्यात आली होती. वरकरणी हा सामाजिक उपक्रम दिसत असल्याने जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला अनुमती दिली असली तरी, गेल्या तीन दिवसांपासून ‘हेलिकॉप्टर जॉय राइड’ या नावाने सहा हजार रुपये घेऊन अंजनेरी किल्ला, ब्रह्मगिरी दर्शन, गंगाद्वार दर्शन व ब्रह्मगिरी प्रदक्षिणेची हवाई सहल घडविण्याची जाहिरातबाजी आयोजकांकडून करण्यात येऊन त्यासाठी बुकिंगदेखील सुरू झाली आहे. या संदर्भातील माहिती पक्षिप्रेमी संस्था व संघटनांना मिळताच त्यांनी हेलिकॉप्टरमधून बीजारोपण करण्याच्या कृतीस हरकत घेत, वन खात्याने परवानगी कशी दिली, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर वनखात्यानेही अभ्यास सुरू केला असता, ब्रह्मगिरी व अंजनेरी पर्वत भागात गिधाडांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे व सध्याचा काळ गिधाडांचा अंडी घालण्याचा असून, डोंगरमाथ्यावर तसेच झाडांवर ते सुरक्षित ठिकाणी अंडी घालतात. बिजारोपणाचे सिड बॉम्ब हेलिकॉप्टरमधून फेकल्यास गिधाडांच्या अंडींना धोका पोहोचू शकतो, त्याचबरोबर सलग तीन दिवस सातत्याने हेलिकॉप्टरने याभागात घिरट्या घातल्यास त्याच्या आवाजाने जिवाच्या भीतीपोटी गिधाडांसह अन्य पक्ष्यांचे याठिकाणाहून स्थलांतर होण्याची शक्यता वन खात्याने व्यक्तकेली व तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
आदल्या दिवशी अनुमती नाकारली
वनखात्याने शनिवारी आपला प्रतिकूल अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. ज्या ठिकाणी बीजारोपण करण्यात येणार त्या जागेचा ताबा वन खात्याकडे असून, आयोजकांनी वन खात्याची कोणतीही अनुमती घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वनखात्याच्या हरकतीमुळे जिल्हा प्रशासनाने आयोजकांना बीजारोपणाची अनुमती नाकारतांनाच ब्रह्मगिरी, अंजनेरी पर्वत परिसरात हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालण्याची परवानगीही रद्द केली आहे.