पुराणातील संदर्भाच्या आधारे हनुमान जन्मस्थान अंजनेरीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:11 AM2021-04-29T04:11:43+5:302021-04-29T04:11:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नाशिक : प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर दंडकारण्यात म्हणजेच नाशिकमध्ये आले. रावणाने सीताहरण केल्यानंतर येथेच त्यांची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर दंडकारण्यात म्हणजेच नाशिकमध्ये आले. रावणाने सीताहरण केल्यानंतर येथेच त्यांची भेट हनुमानाशी झाली. त्यामुळे अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान, त्याचे अनेक पुरावेही पुराणात आढळतात. मात्र यानंतरही आता तिरूमला तिरूपती देवस्थानने हनुमान जन्मस्थान अंजनाद्री पर्वतावर झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता त्यासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावेदेखील हाेऊ लागले आहेत. मात्र, नाशिकमधील महंत आणि इतिहास अभ्यासकांच्या मते पुराणातील संदर्भ बघितले तर हनुमानाचे जन्मस्थान नाशिकजवळील अंजनेरी हेच होय.
रामायणातील घडमोडींच्या आधारे अनेक घटना घडामोडींविषयी अनेक दावे-प्रतिदावे यापूर्वीदेखील करण्यात आले आहेत. त्यानुसार यापूर्वीही झारखंड, कर्नाटक, गुजरातने दावे केले आहेत. आता तिरूमला तिरूपती देवस्थानने परिसरातील अंजनेद्री पर्वतावर हनुमान जन्मस्थान असल्याचा दावा केला आहे. तिरूपती देवस्थानचा दावा कर्नाटक सरकारने फेटाळला आहे आणि कर्नाटकातील कपोल कोप्पल जिल्ह्यात अनेगुंडीजवळ किश्कींधा येथे हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा केला आहे. महााराष्ट्र सरकारने यासंदर्भात अद्याप काही दावा केला नसला तरी रामभूमी नाशिकमधील हनुमान भक्त, महंत तसेच इतिहास अभ्यासकांनी नाशिकजवळील अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला आहे. अंजनेरी गड येथील महामंडालेश्वर स्वामी सोमेश्वरानंद तसेच नाशिकमधील पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिरातील महंत भक्तिचरण दास तसेच इतिहास अभ्यासक डॉ. दिनेश वैद्य यांनी यासंदर्भात दावा केला आहे.
यातील डॉ. दिनेश वैद्य यांनी सांगितले की, दोन हजार वर्षांपूर्वी हस्तलिखिते नव्हती. हनुमानजींचा जन्म पाच ते साडेपाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे यासंदर्भातील लिखाण पुरावा म्हणून आढळणे कठीण असते; परंतु जेव्हा अशी स्थिती होते, त्यावेळी दोन गोष्टींचा आधार घेतला जातो. एकतर पुराणातील संदर्भ घेतले जातात किंवा उत्खनन करूनच पुरावे मांडले जातात. आता पाच - साडेपाच हजार वर्षांपूूर्वीच्या घटनेपूर्वीचा संदर्भ तपासण्यासाठी पुराणांचा संदर्भ घेतला तरी स्कंद पुराणात आणि रामायणातही थेट उल्लेख आहे. त्यानुसार नाशिकमधील अंजनेरी येथेच हनुमान जन्मस्थळ आहे असे मानता येईल. स्वामी सोमेश्वरानंद आणि महंत भक्तिचरण दास यांनीदेखील पुराणातील संदर्भ दिले.
कोट...
श्री त्र्यंबकेश्वराचे म्हणजेच भगवान महादेवाचे स्थान आणि त्यांचा अवतार म्हणून हनुमानजींचा त्याच नजीकच झालेला जन्म याचे पुराणात दाखले आहे. त्यामुळे जन्मस्थान अंजनेरी हेच आहे. यासंदर्भात लवकरच सप्रमाण माहिती राज्य सरकारला दिली जाणार आहे.
- महामंडालेश्वर स्वामी सोमेश्वरानंद, हनुमान जन्मस्थान, अंजनेरी गड
कोट...
पूर्वी दंडकारण्याची व्याप्ती प्रचंड मोठी होती. प्रांतरचना आत्ता झाली; परंतु पूर्वी अनेक भागात हेच दंडकारण्य होते. त्यामुळे रामायणातील घटना आपल्याच भागात झाली असे अनेकजण म्हणतात आणि म्हणूनही शकतात, मात्र पुराणाच्या आधारे जन्मस्थान नाशिकजवळील अंजनेरी हेच आहे. बालक हनुमान मातेच्या कुशीत असल्याची मूर्तीही गडावर प्रतिष्ठापीत आहे.
- महंत भक्तिचरणदास, पंचमुखी हनुमान मंदिर, नाशिक
कोट.
लिखित पुरावे नसतील तर पुराव्यासाठी पुराणाचा आधार घेतला जातो. त्यात रामायणातील घडामोडी नाशिकशी संबंधित आहेत. सीताहरण पंचवटीत झाले आणि त्यानंतरच प्रभुरामचंद्रांची भेट हनुमानजींची झाली. रामायण, स्कंद पुराणात यासंदर्भात उल्लेख आहे.
- डॉ. दिनेश वैद्य, इतिहास अभ्यासक तथा पोथी संशोधक