अनकुटे ग्रामपंचायतीत सरपंच पदाचे रंगले राजीनामा नाट्य
By admin | Published: September 14, 2016 11:57 PM2016-09-14T23:57:59+5:302016-09-15T00:17:33+5:30
अनकुटे ग्रामपंचायतीत सरपंच पदाचे रंगले राजीनामा नाट्य
येवला : अनकुटे ग्रामपंचायतीत सरपंच पदाचे राजीनामा नाट्य रंगले मात्र मंगळवारी या नात्यावर पडदा पडला. अनकुटे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण असुन जिजाबाई माधव गायकवाड ह्या सरपंच आहे. आवर्तन पद्धतीमुळे त्यांची सरपंच पदाची मुदत संपल्याने त्यांच्यावर राजीनाम्या करिता दबाव आणुन त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची माहिती आहे.
राजीनामा सत्यता पडताळणीसाठी ग्रामपंचायतकडे पाठविण्यात आला. व त्यासाठी ९ सप्टेंबर ला सभा बोलविण्यात आली. परंतु त्या दिवशी राजीनाम्याची सत्यता पडताळणी सभेस केवळ ३ सदस्य हजर होते. शिवसेनेचे माजी सरपंच अॅड. बापु गायकवाड यांच्यासह इतर ८ सदस्य बाबासाहेब पवार, वाल्मीक तळेकर, उज्वला बोंबले, सविता पवार, सरपंच जिजाबाई गायकवाड, देटके, गोरे हे गैरहजर राहीले व त्यामुळे कोरम पुर्ण होवू शकला नाही.त्यामुळे राजीनामा सत्यता पडताळणी करता आली नाही. तेव्हा सत्ताधा-यांवर अल्पमताची नामुष्की ओढवली गेली. या कामासाठी दुसरी सभा १३ सप्टेंबर मंगळवारी बोलवण्यात आली. दरम्यान राजकीय वातावरण चांगलेच तापले. सरपंच व सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा रंगला व बाचाबाची, शिवीगाळ इथपर्यंत प्रकरण पोहचले. मंगळवार १३ सप्टेंबर रोजी सभेच्या दिवशी सरपंचानी सभा सुरु होताच राजीनामा मान्य नसल्याचे सांगुन लेखी पत्र ग्रामसेवक योगिता निरभवणे यांच्याकडे दिले. त्यात मी निरक्षर असुन मला वाचता व लिहीता येत नाही राजीनाम्याची मला कोणतीही पुर्व कल्पना नव्हती. तो माझा राजीनामा आहे हे मला कळलेच नाही मला ग्रामसेवकानी राजीनामा असल्याचे सांगितले त्यामुळे राजीनामा मला अमान्य आहे. मी राजीनामा म्हणून कोणताही कागद दिला नाही त्यामुळे माझा राजीनामा नामंजुर करण्यात यावा. सरपंच यांच्या पत्रामुळे व सभेत राजीनामा मान्य नाही असे सांगितल्यामुळे राजीनामा नामंजुर करण्यात आला. व अखेर त्यावर पडदा पडला. (वार्ताहर)