अंनिसचे पुढचे पाऊल : सामाजिक न्याय प्रस्थापित करणार
By admin | Published: December 22, 2014 12:43 AM2014-12-22T00:43:02+5:302014-12-22T00:43:18+5:30
दत्तक योजनेचा पथदर्शी प्रयोग
राकेश जोशी नाशिक
अहमदनगर जिल्हा म्हटला म्हणजे डोळ्यासमोर येतात ते युवकांची निर्घृण हत्त्या, दलित तरुणाचा खून, जवखेड्यातील हत्त्याकांड यासह मन सुन्न करणाऱ्या विविध प्रकारच्या विदिर्ण घटना. गेल्या काही वर्षात घडलेल्या या घटना पाहता सामाजिक ऐक्याची वीण घट्ट करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढचे पाऊल उचलले आहे. त्याची सुरुवात दि. १८ जानेवारीपासून होत आहे. या प्रयत्नांना यश येण्याचा अंनिसला विश्वास आहे.
गेल्या काही वर्षात अत्याचाराच्या जेवढ्या घटना घडल्या त्यातील अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या घटना हादरवणाऱ्या होत्या. सोनईत वाल्मीकी समाजातील तीन युवकांची हत्त्या, खर्डा गावात शाळेत शिकणाऱ्या दलित तरुणाचा खून, जवखेडा दलित हत्त्याकांड. या सगळ्या घटना अहमदनगर जिल्ह्यात घडल्या. यातून समाजमन हादरले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनांचा बारकाईने अभ्यास करत त्याच्या मुळाशी जाण्याचे ठरवले. समितीने सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी, सामाजिक न्यायाची संकल्पना मनामनात रुजविण्यासाठी पथदर्शी प्रयोग करत हा जिल्हाच दत्तक घेण्याचे ठरविले. जातीय अत्याचाराच्या विरोधात एखादा प्रयोग करण्यासह सामाजिक न्यायाची प्रस्थापना हेच प्रभावी माध्यम असू शकते, असा विश्वास असल्यानेच अंनिसने हे पाऊल उचलले आहे. शिक्षक, ग्रामस्थ, प्रशासन, पोलीस, सामाजिक संघटना, यांच्या सहभागातून प्रबोधन मोहीम प्रयोग यशस्वी करण्याचे अंनिसपुढे आव्हान आहे. त्यासाठी प्रशासनाचीही मदत घेत पुढील तीन वर्ष प्रबोधनाचे काम करण्यात येणार आहे.