अण्णासाहेब मोरे : गर्दी टाळण्यासाठी वर्षभरातील पवित्र स्नानाच्या अन्य तारखाही जाहीर कराव्यात
By Admin | Published: July 22, 2014 11:21 PM2014-07-22T23:21:27+5:302014-07-23T00:29:11+5:30
एक कुंभमेळा संपताच दुसऱ्याचीही व्हावी तयारी
नाशिक : नाशिक येथे होणारा कुंभमेळा हा देशभरातील भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यासाठी येणाऱ्या भाविकांची आणि मुळात साधू-महंतांची सोय व्हावी, हे खरेच आहे. त्याचबरोबर पर्वणीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता अनेक सुविधा दिल्या पाहिजेत; परंतु सद्यस्थितीत प्रशासनाची धावपळ लक्षात घेता एक कुंभमेळा संपत असताना, पुढील कुंभमेळ्याची तयारी सुरू केली पाहिजे आणि बाराही वर्षांचे नियोजन आणि पूर्तता सुरूच ठेवली पाहिजे, असे मत अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक सेवा केंद्राचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केले.
अवघ्या वर्षभरावर आलेल्या कुंभमेळ्याच्या तयारी अद्याप दृष्टिपथात नाही. त्यामुळे साधू- महंतांमध्ये शासकीय यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या कारभाराविषयी नाराजी आहे. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनीदेखील त्यास दुजोरा दिला. राज्य शासन आणि अन्य यंत्रणा या कुंभमेळ्याविषयी गंभीर नाहीत. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीची ठोस कामे कोठेही दिसत नाहीत. आता या कामांना वेग यावा यासाठी लोकप्रतिनिधी, माध्यमे आणि साधू-महंत अशा सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. कुंभमेळा हा बारा वर्षांतून एकदा भरतो. साहजिकच त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. गेल्या काही वर्षांत माध्यमांचंी संख्या वाढली आणि भाविकांची संख्याही वाढली आहे. प्रसिद्धी माध्यमांमुळे कुंभमेळ्यासारख्या उत्सवांचा प्रचार होतो, त्यामुळे अगोदर झालेल्या उत्सवापेक्षा कैकपटीने अधिक भाविक येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी दळणवळण, पाणी, रस्ते, स्वच्छतागृह अशा मूलभूत सुविधा देणे आवश्यक असते. त्याचा विचार केला तर कुंभमेळ्याची तयारी खूप अगोदरच केली पाहिजे. ऐनवेळी कुंभमेळ्याची तयारी केली तर ती पूर्ण करताना नाकीनव येतात. याचा विचार केला तर एक कुंभमेळा होत नाही तोच पुढील कुंभमेळ्याची तयारी सुरू केली पाहिजे. गेल्या कुंभमेळ्यात किती जागा लागली आणि सुविधांच्या क्षमता किती वाढवाव्या लागतील याचा विचार करून लगोलग कामे सुरू केली की ऐनवेळी धावपळ करण्याची गरज पडणार नाही, असे ते म्हणाले. आताही पुढील वर्षी कुंभमेळा संपत असताना, पुढील कुंभमेळ्याचे नियोजन आणि तयारी सुरू झाली पाहिजे, असे ते म्हणाले. सद्यस्थितीत शासन-प्रशासन यांचे कुंभमेळ्याच्या तयारीकडे पुरेसे लक्ष नाही, ते दिले पाहिजे. सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज केले पाहिजे म्हणजे विलंब होणार नाही, असेही ते म्हणाले.
कुंभमेळ्यासाठी साधुग्राम हा महत्त्वाचा विषय आहे. साधुग्रामसाठी भूमी अधिग्रहणाचे काम एक वर्ष ्रआधीच केले तर ते योग्य ठरू शकत होते. आजही साधुग्रामसाठी लागणारी जागा, सध्या जागांचे असलेले भाव पाहता जागा देण्याची लोकांची मानसिकता नाही. आणि जमिनी घ्यायच्याच असतील तर संबंधितांना रास्त भाव देऊन जमिनी खरेदी केल्या पाहिजेत म्हणजे कायमस्वरूपी जागा उपलब्ध होऊ शकेल असे सांगून गुरुमाउली म्हणाले, अशा मूलभूत सुविधांची कामे ठीक आहेत; परंतु कुंभमेळा तेरा महिन्यांचा असतो. या कालावधीत तीन पर्वण्यांसाठीच प्रचंड गर्दी होते. सुमारे एक कोटी भाविक कुंभमेळ्यासाठी येत असल्याने शहरावर आणि शहराच्या मूलभूत सुविधांवर ताण पडतो. हे टाळण्यासाठी केवळ तीनच नव्हे, तर वर्षभरातील पवित्र स्नानाच्या सर्व तिथी अगोदरच जाहीर केल्या पाहिजेत. तसे झाल्यास गर्दी तर होणार नाहीच, शिवाय गेल्या कुंभमेळ्यात ज्याप्रमाणे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली तसे होणार नाही. गेल्यावेळी कुंभमेळ्यासाठी पर्वणीच्या तारखा झाल्यानंतर शे- दोनशे वर्षांतील दुर्मीळ योग अमुक तारखेला आहे वगैरे चर्चा पसरल्या. साहजिकच यादिवशी प्रचंड गर्दी झाली आणि दुर्घटना घडली. असे टाळण्यासाठीच वर्षभरातील विविध महत्त्वाच्या तारखा घोषित केल्या तर भाविक वर्षभर येतील आणि एकाच दिवशी पर्वणीसाठी गर्दी करणार नाहीत. पोलीस यंत्रणेलाही गर्दीचे व्यवस्थापन करता येईल. यासंदर्भात राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांनी साधू-महंतांची बैठक बोलावून चर्चा केली पाहिजे. अशा बैठकील आपणही हजर राहू, असेही गुरुमाउली म्हणाले.