ऐन दिवाळीत गोदामाईच्या स्वच्छतेचा मनपाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 06:05 PM2018-10-31T18:05:29+5:302018-10-31T18:08:41+5:30
नाशिक : ऐन सणासुदीच्या काळात गोदामाईचे पात्र अस्वच्छ झाल्याने अत्यंत विदारक चित्र दृष्टीस पडत आहे. यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र ...
नाशिक : ऐन सणासुदीच्या काळात गोदामाईचे पात्र अस्वच्छ झाल्याने अत्यंत विदारक चित्र दृष्टीस पडत आहे. यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाची उदासिनता याला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दिपावलीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेला वेग आला असताना गोदावरीच्या स्वच्छतेचा मात्र प्रशासनाला विसर पडल्याने संताप व्यक्त होत आहे.
नाशिककरांची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची दुरवस्था पाचवीलाच पुजली आहे. नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यास महापालिका अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. ऐन सणासुदीच्या काळात गोदावरीचे रुपडे विदारक झाल्याने प्रदूषणाची पातळी वाढली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न होत असताना दुसरीकडे गोदावरीच्या स्वच्छता अभियानदेखील हाती घेण्याची मागणी होत आहे.
नवरात्रोत्सवापासून गोदावरीला प्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. नवरात्रोत्सवात सर्रासपणे निर्माल्य गोदापात्रात नागरिकांकडून टाकण्यात आले. त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून कुठलेही निर्बंध घातले गेले नाही. तसेच विजयादशमीच्या दरम्यानही गोदावरीची अवस्था तशीच राहिली. त्यामुळे गोदापात्रावर तरंगणाºया निर्माल्याचे प्रमाण वाढत गेले. तसेच गोदाकाठालगत ठेवलेले निर्माल्य कलशदेखील स्वच्छ करण्याची तसदी संबंधित विभागाकडून घेतली गेली नसल्याने कलश ओसंडून वाहू लागले होते. निर्माल्याचा कचरा मोकाट जनावरांकडून विस्कटला गेला.
नदीपात्रावर शेवाळाचा हिरवा गालिचा
तपोवन परिसरात गोदामाईच्या पात्रावर मोठ्या प्रमाणात शेवाळ साचले असून शेवाळ हटविण्याचे कार्य तातडीने हाती घेण्याची गरज आहे. अन्यथा काही दिवसांनी पाणवेलींचा विळखा अधिक घट्ट होऊन गोदामाईचा श्वास कोंडला जाण्याची शक्यता आहे. टाकळी रस्त्यालगत असलेल्या मलशुध्दीकरण केंद्रातून सांडपाण्यावर प्रक्रिया करुन नदीपात्रात सोडले जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला तरी हे पाणी नदीपात्रात मिसळताच नदी फेसाळते. यामुळे विषारी रासायनिक द्रव्य पाण्यात मिसळत असल्याचे स्पष्ट होते. जणू गोदापात्रात ‘विष’ मिसळत असून तीच्या तोंडाला ‘फेस’ येत असल्याचे चित्र टाकळी-तपोवन रस्त्यावरुन मार्गस्थ होताना नजरेस पडते.