'अंनिस'च्या ‘स्मशान सहली’ला नाशिकमध्ये पोलिसांकडून ब्रेक; सर्वपित्री अमावस्येनिमित्त केले होते आयोजन
By अझहर शेख | Published: September 25, 2022 09:27 PM2022-09-25T21:27:06+5:302022-09-25T21:32:45+5:30
शालेय विद्यार्थ्यांच्या मनातील भुतबाधेविषयीचे समज-गैरसमज दुर व्हावेत, अंधश्रद्धेविषयीचे निर्मूलन करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ने शालेय विद्यार्थ्यांच्या स्मशान सहलीचे नियोजन केले.
नाशिक : भाद्रपद सर्वपित्री अमावस्येचे औचित्य साधत जनप्रबोधनासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धींगत होण्यासाठी रविवारी (दि.२५) रात्री दहा ते बारा वाजताच्या सुमारास ‘स्मशान सहल’ आयोजित करण्यात आली होती. याबाबतचे मॅसेजदेखील सोशलमिडियावरून व्हायरल करण्यात आले; मात्र संध्याकाळच्या सुमारास संयोजकांनी पोलीस आयुक्तांची लेखी परवानगी आवश्यक असल्याने तुर्तास सहल रद्द केल्याचेही सोशलमिडियाद्वारे मॅसेजमधून जाहीर केले.
शालेय विद्यार्थ्यांच्या मनातील भुतबाधेविषयीचे समज-गैरसमज दुर व्हावेत, अंधश्रद्धेविषयीचे निर्मूलन करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ने शालेय विद्यार्थ्यांच्या स्मशान सहलीचे नियोजन केले. अंनिसचे जिल्हा संयोजक व्ही. टी. जाधव यांनी सर्वांना याबाबत कल्पनाही दिली. मात्र यासाठी पोलीस आयुक्तालाकडे कुठल्याहीप्रकारे लेखी अर्ज करण्यात आला नव्हता. यामुळे पंचवटी पोलिसांनी रविवारी सायंकाळी या सहलीला परवानगीअभावी स्थगिती दिली. किमान लेखी अर्ज अपेक्षित होता, असे मत पोलिसांनी मांडले. तर, यापूर्वी कधीही अर्ज न केल्याचा दावा अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
मनाई आदेश लागू -
विविध सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांकडून शहरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्व परवानगीशिवाय कोणताही सामूहिक कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी घेता येत नाही. अंनिसकडून ‘स्मशान सहलीचे नियोजन करण्यात आले; मात्र यासाठी पोलिसांना पुर्व परवानगीकरिता लेखी अर्ज दिला नाही. यामुळे ऐनवेळी स्मशान सहलीला खाकीकडून ‘ब्रेक’ लागला.