कौमार्य चाचणीविरोधात अंनिसचा राष्ट्रीय स्तरावर लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:20 AM2021-08-18T04:20:31+5:302021-08-18T04:20:31+5:30
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमातून कौमार्य चाचणीचा उल्लेख वगळल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देशभरातील विविध ...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमातून कौमार्य चाचणीचा उल्लेख वगळल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देशभरातील विविध वैद्यकीय शिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमातूनही हा विषय वगळण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय स्तरावर लढा सुरू केला असून, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने कौमार्य चाचणीचा उल्लेख वगळला असला तरी देशभरातील विविध विद्यापीठांत हा विषय अजूनही शिकवला जातो. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या नॅशनल मेडिकल कमिशनने पुढाकार घेऊन हा विषय भारतभरातील अभ्यासक्रमातून वगळण्यात यावा, यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी प्रयत्न करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नॅशनल मेडिकल कमिशन, दिल्ली यांनाही निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे. अंनिस गेल्या नऊ वर्षांपासून जात पंचायतच्या मनमानीविरोधात काम करत आहे. काही समाजांतील कौमार्य चाचणीच्या अनेक घटना उघड केल्या आहेत. काही घटनांत रीतसर गुन्हे दाखल केले आहेत. कौमार्य चाचणीचा व चारित्र्याचा काहीही संबंध नसतो. अगदी खेळताना, सायकल चालवताना, व्यायाम करताना गुप्तांगातील पातळ पडदा फाटू शकतो, असे प्रबोधन अंनिस करत आहे. मात्र, अशा कुप्रथांना उत्तेजन देण्याचे काम वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमातून होत असल्याचा आरोपही या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.