रिपाइंचा नाशकात वर्धापनदिन सोहळा
By admin | Published: September 16, 2016 11:57 PM2016-09-16T23:57:36+5:302016-09-16T23:57:48+5:30
साठावा वर्धापनदिन : मुख्यमंत्र्यांसह आठवलेंची उपस्थिती
नाशिक : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा ६०वा वर्धापन दिन सोहळा नाशिकला दि. ३ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला असून, यावेळी केंद्रीय मंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा नागरी सत्कार आयोजित केल्याची माहिती रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह सेना-भाजपाचे अनेक मंत्रिगण व लोकप्रतिनिधी हजेरी लावणार असल्याने राजकीयदृष्ट्याही या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.
रिपाइं येत्या ३ आॅक्टोबरला ६०व्या वर्षात पदार्पण करत आहे. नाशिक ही दलित चळवळीच्या दृष्टीने ऐतिहासिक भूमी असल्याने सदर वर्धापन दिन सोहळा नाशिकला साजरा करण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती प्रकाश लोंढे यांनी दिली. ३ आॅक्टोबरला दुपारी ३ वाजता गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह सेना-भाजपाचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
याचवेळी दलित चळवळीत योगदान देणाऱ्या ५९ व्यक्तींचा गौरव करण्यात येणार असून, रामदास आठवले यांचाही नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे प्रकाश लोंढे यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर रामदास आठवले यांचे पहिल्यांदाच नाशिकला आगमन होत असल्याने त्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली जात आहे. याचबरोबर सद्यस्थितीत सेना-भाजपात वाढत चाललेली दरी कमी करण्यासाठीही या कार्यक्रमाकडे पाहिले जात असून, त्यासाठीच आठवले यांनी युतीतील नेत्यांना एकत्र आणण्याचे ठरविले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, दि. ७ आॅक्टोबरला शिर्डी येथे रिपाइंच्या वतीने दलित-मराठा ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंबंधीही महत्त्वपूर्ण चर्चा नाशिकला होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)