नाशिकचा उमेदवार घोषित करा; भुसे-महाजनांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By संजय पाठक | Published: April 27, 2024 06:20 PM2024-04-27T18:20:54+5:302024-04-27T18:22:08+5:30
भुसे आणि महाजन यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली आणि उमेदवारी घोषित करावी अशी विनंती केली.
नाशिक- लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला तरी नाशिकमधून महायुतीची उमेदवारी घोषित होऊ शकलेली नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. मतदानाचे कांऊटडाऊन सुरू झाल्याने नाशिकची उमेदवारी तातडीने घोषित करा, असे साकडे नाशिकचे विद्यमान पालकमंत्री दादा भुसे आणि माजी पालकमंत्री, भाजपाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घातले आहे.
भुसे आणि महाजन यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली आणि उमेदवारी घोषित करावी अशी विनंती केली. त्यानुसार एक दोन दिवसात उमेदवारी घेाषित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गिरीश महाजन यांनी यासंदर्भात लोकमतशी बोलताना दुजोरा दिला, मात्र, विलंब नक्की का होतोय हे सांगता येत नसल्याचे सांगितले. परंतु आता दोन दिवसात उमेदवार घोषित करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला. नाशिकच्या जागेवर भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. या तीन पक्षांना मिळून सुमारे सोळा इच्छुक उमेदवार आहेत.
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे हे देखील दावेदार आहेत. उमेदवार घोषित करण्यास उशीर होत असल्याने छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे अगोदरच जाहीर केले आहे.