नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेच्या वार्षिक सभेत संचालक-विरोधकांमध्ये हमरीतुमरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:59 PM2018-09-22T23:59:00+5:302018-09-23T01:23:20+5:30
नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पहिल्याच मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे या विषयाबाबत निवेदन देत असून, त्याची पोहोच द्यावी यावरून संचालक व विरोधक यांच्यात हमरीतुमरी व वाद निर्माण झाला अवघ्या काही मिनिटांत सर्व विषयांना मंजुरी देत सभा आटोपती घेण्यात आली.
नाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पहिल्याच मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे या विषयाबाबत निवेदन देत असून, त्याची पोहोच द्यावी यावरून संचालक व विरोधक यांच्यात हमरीतुमरी व वाद निर्माण झाला अवघ्या काही मिनिटांत सर्व विषयांना मंजुरी देत सभा आटोपती घेण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी संचालक मंडळाच्या कारभाराविषयी निषेधाच्या घोषणा देत सहकार विभागाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले. जेलरोड इंगळेनगर येथील व्यापारी बॅँक शाखेच्या सभागृहात शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजता बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सभेला प्रारंभ झाला.
बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सभेत सर्वांना बोलू दिले जाईल, मात्र एकाच विषयावर वारंवार बोलू नये असे स्पष्ट केले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल, पण कोणी गडबड, गोंधळ करू नये, काहीजण गोंधळ घालण्याच्या उद्देशाने आले असल्याचा संशय व्यक्त करत सर्वांना बोलू द्यावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
त्यानंतर विषय पत्रिकेवरील पहिल्या मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन करून त्यास मंजुरी देण्याचा ठराव मांडण्यात आला. अॅड. सुनील बोराडे यांनी इतिवृत्तावर बॅँकेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सही नसून इतिवृत्त बेकायदेशीर असल्याने ते नामंजूर करावे, असे सांगितले. याबाबत निवेदन देत असून, त्यांची पोहोच द्यावी अशी मागणी बोराडे यांनी केली. बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी निवेदन द्या, पोहोच देता येणार नाही, असे सांगत असतानाच काहीजण उभे राहिल्याने वाद-विवादास प्रारंभ झाला. सभासद अरुण गिरजे यांनी उभे राहत खाली बसा, एकालाच बोलू द्या, असे सांगितल्याने गोंधळात भर पडली. आम्हाला बसायला सांगणारा संचालक आहे का असे म्हणत वादविवाद वाढत गेल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला. यावेळी अध्यक्षांसमोरील माईक हिसकवण्यात आला, तर संचालक अशोक सातभाई यांच्यासोबत काही जणांची शाब्दिक बाचाबाची झाली. व्यासपीठाजवळ येणाऱ्यांना अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी स्वत: खाली उतरत अडवले. या गोंधळामुळे सर्वच सभासद उभे राहिले.
विविध आरोपांचे बॅनर अंगावर लावले
गोंधळामुळे संचालक मंडळाने सभा आटोपती घेतल्याने विरोधकांनी त्यांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. यावेळी ज्येष्ठ सभासद पां.भा. करंजकर, माजी संचालक सतीश मंडलेचा, हेमंत गायकवाड, प्रकाश गोहाड, शिरीष लवटे, अजित गायकवाड, सुदाम ताजनपुरे, अॅड. मुकुंद आढाव आदिंनी विविध आरोपांचे बॅनर अंगावर लावून तीव्र निषेध व्यक्त केला. मागील सभेचे इतिवृत्त अनाधिकृत असल्याने ते मंजुर करू नये, व्यवस्थापन वाढलेला खर्च, लेखा परीक्षण अहवालास विरोध, संचालकांनी सुचविलेल्या लेखा परीक्षकांची नेमणूक करण्यात येऊ नये, थकबाकीदार कर्जदारास कर्ज माफ करू नये, प्रकाश गोहाड यांचे सभासदत्व रद्द करू नये या मागण्यांचे विरोधकांचे निवेदन असून सभा गुंडाळण्यात आल्याने सहकार विभागाला देऊन दाद मागणार असल्याचे सांगितले.