येवला बाजार समितीची वार्षिक सभा
By Admin | Published: September 30, 2016 11:32 PM2016-09-30T23:32:39+5:302016-09-30T23:33:08+5:30
चार महत्त्वपूर्ण ठराव संमत : अंदरसूल उपबाजार आवारात कार्यालयाची मागणी
येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सभापती उषाताई शिंदे होत्या.
प्रारंभी गेल्या वर्षभरातील दिवंगत नामवंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बाजार समितीचे सचिव डी.सी.खैरनार यांनी प्रास्ताविकात बाजार समितीच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेतला. अंदरसूल उपबाजार आवारात कार्यालय व कम्पाउण्ड या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे यांनी केली.
येवला व मनमाडच्या केंद्रस्थानी असणाऱ्या राजापूरला नवीन उपबाजार समिती सुरू करावी, अशी मागणी सरपंच प्रमोद बोडके यांनी करून येवला व अंदरसूल मार्केट कमिटीत संचालक व कर्मचारी यांच्या कामामुळे त्याच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. शेतकरी संघटना नेते संतू पाटील झांबरे यांनी शासनावर टीकेची झोड उठवत नियमन मुक्तीच्या धोरणात शासनाने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला. संचालक भास्कर कोंढरे यांनी शासनाला घरचा अहेर देत, धरसोडीच्या धोरणाने शेतकरी भरडला जात असल्याचा आरोप केला. यावेळी बाजार समिती संचालक मकरंद सोनवणे, साहेबराव सैद यांची भाषणे झाली.
बाजार समितीत चार कोटी ८१ लाखांची कामे यंदाच्या वर्षात हाती घेतली असल्याची माहिती दिली. पक्षाचे जोडे बाहेर ठेवून पारदर्शी पद्धतीने चालणाऱ्या कामास सहकार्य करणाऱ्या संचालक मंडळ व कर्मचारी आणि शेतकरी यांना धन्यवाद दिले. शासनाच्या म्हणण्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी बाजार समिती बाहेर विकला त्या शेतकऱ्याच्या अनुदानाचे काय, असा सवालही सभापती उषाताई शिंदे यांनी उपस्थित केला. सूत्रसंचलन डी. सी. खैरनार यांनी केले तर आभार उपसभापती गणपत कांदळकर यांनी मानले. या सभेस मविप्र संचालक अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, बाळासाहेब लोखंडे, बी.आर लोंढे, राजेंद्र गायकवाड, सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांच्यासह कृउबा संचालक संजय बनकर, नवनाथ काळे, अशोक मेंगाणे, मोहन शेलार, मकरंद सोनवणे, भास्कर कोंढरे, कांतीलाल साळवे, साहेबराव सैद, गोरख सुरासे, देवीदास शेळके, राधाबाई गायकवाड उपस्थित होते. सभेच्या नियोजनासाठी बाजार समितीचे सचिव डी.सी. खैरनार, कर्मचारी कैलास व्यापारे, बंडू अहेर, संजय ठोक, रवींद्र बोडके, अनिल कांगणे, सिद्धेश्वर जाधव उपस्थित होते. (वार्ताहर)