वार्षिक अभ्यास प्रात्यक्षिक : नाशिकच्या देवळाली स्कूल आॅफ आर्टिलरीच्या मैदानाने अनुभवला युद्भूमीचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 05:15 PM2018-01-16T17:15:39+5:302018-01-16T17:27:15+5:30
स्कूल आॅफ आर्टिलरीच्या वतीने आयोजित वार्षिक अभ्यास सराव प्रशिक्षण प्रात्यक्षिकाचे. अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या भारतीय तोफखाना भविष्यात कुठल्याहीप्रसंगी उद्भवलेल्या युद्धाप्रसंगी सैन्याचा पाठीचा कणा बनून स्वत:ला सिद्ध करत निर्णायक भूमिका बजावण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश मंगळवारी (दि.१६) या प्रात्यक्षिक सोहळ्यातून देण्यात आला.
नाशिक : ३६० अंशांत फिरून बॉम्ब हल्ला करणारी ‘बोफोर्स’, वीस सेकंदात चाळीस अग्निबाण दागण्याची क्षमता ठेवणा-या रॉकेट लॉन्चरने केलेला रॉकेट हल्ला, तर उखळी मारा करणाºया सॉल्टम, मॉर्टर, हॉवित्झर-७७, १३०-एम.एम. रशियन तोफांसह एकूण सात अत्याधुनिक तोफांचा कानठळ्या बसविणारा व परिसर हादरून सोडणाºया बॉम्ब हल्ल्याने नाशिकच्या देवळाली येथील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्राचा (स्कूल आॅफ आर्टिलरी) गोळीबार मैदानाने युद्धभूमीचा थरार अनुभवला.
निमित्त होते, स्कूल आॅफ आर्टिलरीच्या वतीने आयोजित वार्षिक अभ्यास सराव प्रात्यक्षिकाचे. अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या भारतीय तोफखाना भविष्यात कुठल्याहीप्रसंगी उद्भवलेल्या युद्धाप्रसंगी सैन्याचा पाठीचा कणा बनून स्वत:ला सिद्ध करत निर्णायक भूमिका बजावण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश मंगळवारी (दि.१६) या प्रात्यक्षिक सोहळ्यातून देण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अतिविशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरावणे, कमान्डंंट स्कूल आॅफ आर्टिलरी लेफ्टनंट जनरल रणविरसिंग सलारिया, उप कमान्डंट तथा आर्टिलरीचे मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल एस. आर. पाणीग्राही, लेफ्टनंट कर्नल पी. के. शर्मा, मेजर जनरल पवनकुमार सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते.
लष्करी थाटात सुरू झालेल्या या प्रात्यक्षिक सोहळ्याप्रसंगी प्रारंभी हलकी मॉर्टर तोफांद्वारे शत्रूचे लक्ष्य जवानांनी भेदले. उखळी मारा उंचावरून करण्याची क्षमता असलेल्या १२०, १३०, १५५ एम.एम. हलक्या तोफांद्वारे अचूकपणे लक्ष्य भेदण्यात आले. यावेळी सहा बोफोर्स तोफांनी एकाच वेळी ‘हर्बरा’ या लक्ष्यावर बॉम्बहल्ला करत तळ उद्ध्वस्त केला. यावेळी उपस्थितांच्या अंगावर शहारे आले, तर अनेकांनी आपल्या कानावर हात ठेवले. या प्रात्यक्षिक सोहळ्यासाठी इजिप्त, मंगोलिया, केनिया, श्रीलंका, व्हिएतनाम, नेपाळ या देशांच्या सैनिकांनाही पाहुणे म्हणून खास या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तसेच भारतीय वायू दलाच्या सैनिकांच्या तुकडीनेही तोफखान्याची क्षमता यावेळी अनुभवली.
लढाऊ हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती
गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरचे चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टरद्वारे युद्धभूमीवर सैनिकना रसद पुरविणे, अतिरिक्त सैन्याला पाचारण करणे, जखमींना युद्धभूमीवरून हलविण्याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले. ‘ध्रुव’मधून आठ हजार फुटांवरून युद्धभूमिवर पॅराशुटद्वारे दाखल झालेल्या सैनिकांचे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाटात स्वागत केले.