पीडित महिलांच्या स्मृत्यर्थ अनोखे श्राद्ध
By admin | Published: October 1, 2016 12:19 AM2016-10-01T00:19:04+5:302016-10-01T00:19:19+5:30
मालेगाव : तरुआई वृक्षप्रेमी संस्थेचा आदर्श सामाजिक उपक्रम
संगमेश्वर : अत्याचारपीडित महिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण करून त्यांचे श्राद्ध अनोख्या पद्धतीने घालून एक नवा पायंडा वृक्षप्रेमी तरुआई संस्थेने पाडला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वत्र पितृपक्ष साजरा केला जात आहे. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून विधिवत पूजा करून नैवेद्य दाखविला जात आहे. या परंपरेनुसार अत्याचारपीडित देशभर गाजलेल्या दिल्ली येथील निर्भया, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ज्या घटनेने खळबळ उडवून दिलेल्या कोपर्डी व इतर ज्ञात-अज्ञात अत्याचारात बळी पडलेल्या मुली, महिला यांचे स्मरण ठेवत त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निर्भयास्मृती वृक्षारोपणाचा कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर तरुआई संस्थेने घडवून आणला. अत्याचारात बळी पडलेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १२ रोपांचे रोपण मान्यवरांच्या उपस्थितीत करून विधायक व पर्यावरणपूरक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आरबीएच कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षिका व महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या. पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, पोलीस निरीक्षक राम भालसिंग, परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, आयेशानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मांडवकर, आरबीएच कन्या विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती हिरे, पर्यवेक्षिका एल. टी. पाटील आदिंनी वृक्षारोपण केले. वृक्षारोपणात वडाचे सहा, पिंपळाचे पाच व एक पिंपरीच्या रोपाचे रोपण करण्यात येऊन अत्याचारपीडित महिलांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहून त्यांचे श्राद्ध घातले. (वार्ताहर)