तुकाराम सुपे याची नाशकातही बेनामी संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 01:53 AM2021-12-23T01:53:10+5:302021-12-23T01:54:04+5:30
राज्य परीक्षा मंडळाचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याने नाशिकमध्येही २०१३ ते २०१६ या कालावधीत शिक्षण उपसंचालकपदाचा कार्यभार पाहताना त्याच्या वाहनचालक व्याह्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शिक्षक, शिक्षणसेवक, संस्थाचालकांची अडवणूक करीत माया जमविल्याची चर्चा त्याच्या अटकेनंतर होऊ लागली आहे.
नाशिक : राज्य परीक्षा मंडळाचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याने नाशिकमध्येही २०१३ ते २०१६ या कालावधीत शिक्षण उपसंचालकपदाचा कार्यभार पाहताना त्याच्या वाहनचालक व्याह्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शिक्षक, शिक्षणसेवक, संस्थाचालकांची अडवणूक करीत माया जमविल्याची चर्चा त्याच्या अटकेनंतर होऊ लागली आहे.
नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक असताना सुपे याने त्याच्या व्याह्याकडेच ही माया जमविण्याचे सर्वाधिकार दिले होते. त्यातूनच सुपे याने इगतपुरी व त्र्यंबकेश्वरसारख्या निसर्गरम्य परिसरात फार्महाऊससह नाशिकमध्ये उच्च उत्पन्न गटाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूररोड भागात प्रशस्त फ्लॅट अशा प्रकारची बेनामी संपत्ती जमविल्याचेही बोलले जात आहे. उपसंचालक कार्यालयात शाळा मान्यता, शालार्थ आयडी, शिक्षक, शिक्षणसेवक पदोन्नतीसारख्या प्रकरणांमधून अडवणूक करून कार्यालयाबाहेरच तडजोड करण्याची प्रथाच सुपे याच्या कार्यकाळात पडली होती. यासाठी त्याचा वाहनचालक व्याही (मुलाचे सासरे) त्याला मदत करीत होता. त्यामुळे सुपे याच्या नाशिक व नंदुरबारमधील नातेवाइकांचीही चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
--
व्याह्याच्या घरीच होता मुक्काम
नाशिकमध्ये उपसंचालक असताना सुपे बहुधा त्याच्या वाहनचालक असलेल्या व्याह्याकडेच मुक्कामी असे. कार्यालयात अडवलेल्या बहुतांश प्रकरणांना याच ठिकाणांहून हिरवा कंदिल दिला जाई. त्यामुळे सुपे कार्यालयीन दिवसांत बहुधा पुण्यात आणि सप्ताहाअखेर नाशकात राहून अशा प्रकारचे नियमबाह्य कामकाज पूर्णत्वास नेत असल्याचे समोर येत आहे.
--
चालक व्याह्यानेच चालविला कारभार
राज्य परीक्षा मंडळ आयुक्तपदावर कार्यरत असताना तुकाराम सुपे यास भ्रष्टाचार प्रकरणात अटक झाली आहे. मात्र, त्याच्या गैरकारभाराची पाळेमुळे नाशिकमध्येही रुजलेली आहेत. नाशिकमध्ये उपसंचालक कार्यालयात अडकून पडलेली प्रकरणे मार्गी लावण्यासाठी त्याचा व्याही वाहनचालक सोनवणे याने उपसंचालक कार्यालयाचे सर्वाधिकार हातात घेत शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्था चालकांची अडवणूक केल्याचे शिक्षक मुख्याध्यापक संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.