आणखीन एक बाधित; आरोग्य यंत्रणा कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:52 PM2020-04-13T23:52:28+5:302020-04-13T23:52:51+5:30
नाशिक : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत चालला असून, सोमवारी सकाळी सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात ...
नाशिक : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत चालला असून, सोमवारी सकाळी सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. याशिवाय मालेगाव येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक, मित्रपरिवाराची यादी तयार करून त्यातील अकरा रुग्णांना रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. समाधानाची बाब म्हणजे ज्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्याच्या बरोबरच्या पाच जणांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात सहा संशयित रुग्ण दाखल झाले असून, ८० रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावात कुटुंब प्रमुखाचा कोरोनाच्या अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णासह त्याच्या कुटुंबातील सहा जणांना दोन दिवसांपूर्वीच आरोग्य यंत्रणेने पोलिसांच्या मदतीने नाशिक येथील महानगरपालिकेच्या डॉ. जाकिर हुसेन रु ग्णालयातील कोरोना विलगिकरण कक्षात दाखल केले होते.
जिल्ह्यात यापूर्वी लासलगाव, मालेगाव, चांदवड येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. आता सिन्नर तालुक्यात बाधित सापडल्याने आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. लासलगाव येथील रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाला असल्याने आरोग्य यंत्रणेच्या कामाबाबत खात्री वाटत आहे.