बस कंपनीच्या दुसऱ्या संचालकाचाही राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 01:06 AM2019-12-11T01:06:56+5:302019-12-11T01:07:28+5:30
महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीची रचना पूर्ण होत नाही तोच वारंवार संचालक बदलावे लागत आहेत. त्यातच विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या पाठोपाठ शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनीदेखील संचालकपदासाठी काम करण्यास स्वारस्य नसल्याचे राजीनाम्याचे पत्र आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले आहे.
नाशिक : महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीची रचना पूर्ण होत नाही तोच वारंवार संचालक बदलावे लागत आहेत. त्यातच विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या पाठोपाठ शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनीदेखील संचालकपदासाठी काम करण्यास स्वारस्य नसल्याचे राजीनाम्याचे पत्र आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले आहे. त्यामुळे बससेवा सुरू होण्याच्या आतच कंपनीचा प्रवास खडतर झाला आहे.
महापालिकेने शहर बससेवा सुरू करण्यासंदर्भात सहा वेळा प्रस्ताव फेटाळले होते. मात्र राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने गेल्यावर्षी महापालिकेला त्याबाबत अनुकूलता कळवावी लागली होती. महासभेत भाजपने बससेवेच्या समर्थनाची घोषणा केली खरी, परंतु परिवहन समिती गठीत करावी असा ठराव करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बससेवा व्यवहार्य पद्धतीने चालवायची असेल तर समितीपेक्षा कंपनीच गठीत करावी, अशी भूमिका घेतली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती मान्य केली. त्यामुळे स्थानिक भाजप सत्ताधाऱ्यांची अडचण झाली. त्यांनी कंपनीची रचना करताना त्यात लोकप्रतिनिधींचा भरणा अशा पद्धतीने केला की, ही परिवहन समिती की कंपनी? असा प्रश्न निर्माण झाला.
महासभेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी कंपनी स्थापनेची कार्यवाही सुरू केली. साधारणत: गेल्या मे महिन्यात कंपनी स्थापन झाली. मात्र,त्यातून संचालक म्हणून विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असताना अजय बोरस्ते यांनी बाहेर राहण्याची भूमिका घेतली आणि कागदपत्रे देण्यास नकार दिला. त्यानंतर कंपनीचे गठन झाले आणि सभागृह नेते तसेच गटनेते बदलले. त्यांची नोंद घेतली जात नाही तोच विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे कामकाज रखडले. विधानसभा निवडणूक पार पडत नाही तोच महापौर आणि उपमहापौरांची निवड झाली. त्यामुळे कंपनीच्या संचालकपदाच्या नावांत बदल झाले. आता कामकाज सुरळीत होईल अशी अपेक्षा असतानाच शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनीदेखील कामकाज करण्याची इच्छा नसल्याने राजीनामा दिला आहे.
मार्चमध्ये बससेवेची डबल बेल...
महापालिकेच्या शहर बस वाहतुकीसाठी मार्च महिन्यात डबल बेल मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेने ४०० बससाठी करार केला आहे. त्यातील इलेक्ट्रिक आणि सीएनजीच्या प्रत्येकी ५० बस फेबु्रवारी किंवा मार्चमध्ये दाखल होतील. त्यामुळे मार्च महिन्यात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.