जुन्या नाशकात कोरोनामुळे आणखी एका वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:28 AM2020-06-15T00:28:16+5:302020-06-15T00:29:45+5:30
शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येने सहाशेचा टप्पा पार केल्यानंतरदेखील ही संख्या वाढतच आहे. परंतु त्यापेक्षा दाट वस्तीच्या भागात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शनिवारी (दि.१३) जुन्या नाशकात दोन जणांचे मृत्यू झाल्यानंतर रविवारी (दि.१४) आणखी एका बाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या ३२ झाली आहे, तर ५९ बाधित आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ६७३ झाली आहे.
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येने सहाशेचा टप्पा पार केल्यानंतरदेखील ही संख्या वाढतच आहे. परंतु त्यापेक्षा दाट वस्तीच्या भागात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शनिवारी (दि.१३) जुन्या नाशकात दोन जणांचे मृत्यू झाल्यानंतर रविवारी (दि.१४) आणखी एका बाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या ३२ झाली आहे, तर ५९ बाधित आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ६७३ झाली आहे.
नाशिक शहरात कोरोनाबाधिताच्या वाढत्या संख्येने जुने नाशिक आणि वडाळा भाग हॉटस्पॉट तर झाला आहेच, परंतु आता डेथ स्पॉटदेखील झाला आहे. या भागात आत्तापर्यंत १९ जणांचे मृत्यू झाले आहेत. परंतु यानंतरदेखील मृतांची संख्या वाढतच आहे. रविवारी (दि.१४) चौक मंडई येथील एका बाधिताचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या ६७ वर्षीय वृद्धाला ११ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वृद्धाच्या मृत्यूनंतर त्याचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, पखालरोड भागातील ३० वर्षीय युवकाचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे पखालरोड येथील सात वर्षीय मुलीला कोरोना संसर्ग झाला आहे. नाईकवाडी पुरा येथे पुन्हा एक रुग्ण आढळला आहे. त्यावर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुद्वारारोडवरील नऊ वर्षांच्या मुलाला संसर्ग झाला असून, भाभानगर येथेही एक रुग्ण आढळला आहे. वडाळागाव येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष आणि त्याच कुटुंबातील ५८ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे.
गेल्या काही दिवसांत वडाळा येथील बाधित आढळणे थांबले होते. मात्र आता पुन्हा तेथे दोन रुग्ण आढळले आहेत, तर दुसरीकडे सिडकोतील कामटवाडे भागात ४६ वर्षीय आणि पंचवटीत हिरावाडीत ३५ वर्षीय पुरुषाला संसर्ग झाला आहे.