ब्रिटनमधून परतलेला आणखी एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 01:14 AM2020-12-28T01:14:06+5:302020-12-28T01:15:30+5:30
ब्रिटनमधून नाशिक जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची तपासणी करत असताना आज आणखी एक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्याची नोंद महापालिकेकडे झाली आहे त्याची स्ट्रेन टेस्ट करण्यासाठी तपासणी नमुना पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
नाशिक : ब्रिटनमधून नाशिक जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची तपासणी करत असताना आज आणखी एक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्याची नोंद महापालिकेकडे झाली आहे त्याची स्ट्रेन टेस्ट करण्यासाठी तपासणी नमुना पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. कालच स्कॉटलंड येथून आलेल्या एका नागरिकाला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. त्यामुळे त्याच्या आणि कोरोना संसर्ग झालेल्या त्याच्या आईच्या चाचणीचा नमुनाही पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आला आहे.
रविवारी (दि २७) पॉझिटिव्ह आलेला नागरिक हा गंगापूर रोडवर वास्तव्यास असून, ७ डिसेंबर रोजी नाशिक मध्ये आला आहे. तसा त्याचा २८ दिवसांचा कालावधी जवळपास पूर्ण झाल्यासारखेच होते. परंतु त्या नागरिकाला त्रास झाल्याने खासगी लॅब मध्ये तपासणी केली असता आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संबंधित नागरिक हा परिसरातील कोरोना बधितांच्या संपर्कात आला असावा असा महापालिकेचा अंदाज आहे.
नाशिक जिल्ह्यात २५ नोव्हेंबरपासून एकूण १२१ प्रवासी ब्रिटनमधून आले आहेत. त्यापैकी शहरात आलेल्या ९६ पैकी ६५ नागरिकांना शोधण्यात आले असून ३० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ग्रामीण भागात २५ पैकी २१ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
चार बालकांची
तपासणी नाही
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण २५ प्रवासी ब्रिटनमधून आले आहेत. त्यापैकी २१ प्रौढ नागरिकांची तपासणी करण्यात आली ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. चार लहान मुलांची मात्र तपासणी करण्यात आलेली नाही