शहरात स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी
By admin | Published: June 2, 2017 01:58 AM2017-06-02T01:58:48+5:302017-06-02T01:59:37+5:30
नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लूने अजूनही पाठ सोडलेली नसून, बुधवारी (दि. ३१) देशवंडी, ता. सिन्नर येथील एका महिलेचा स्वाइन फ्लूने बळी घेतला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लूने अजूनही पाठ सोडलेली नसून, बुधवारी (दि. ३१) देशवंडी, ता. सिन्नर येथील एका महिलेचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. त्यामुळे जिल्ह्यात बळींची संख्या २६ झाली असून, त्यात शहरातील ९ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयांसह जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वाइन फ्लूच्या कक्षात विशेष दक्षता घेतली जात असून, संशयितांचे स्क्रिनिंग केले जात असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.
शहरात मार्च महिन्यापासून स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत भर पडताना दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात १, फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये ५४, एप्रिलमध्ये ६६ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. मे महिन्यात उपचारासाठी दाखल ३८ संशयितांपैकी २३ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. त्यात बुधवारी शहरात खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या सीमा पुंडलिक बरके (वय ४२) या महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिला ही सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील आहे. मे महिन्यात स्वाइन फ्लूचा जोर काहीसा कमी झालेला असला तरी त्याने पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढल्या आहेत. रुग्णालयात संशयित रुग्णांचे स्क्रिनिंग केले जात आहे. आतापर्यंत २५०० हून रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. स्वाइन फ्लूच्या कक्षातही रुग्णांबाबत विशेष दक्षता घेतली जात असून, औषधांचा साठा पुरेसा असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. डेकाटे यांनी दिली.