रेंडाळे येथे काळवीटाची शिकार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:02 AM2021-01-02T00:02:06+5:302021-01-02T01:16:09+5:30
येवला तालुक्यातील वनसंवर्धन क्षेत्र परिसर असलेल्या रेंडाळे येथील अशोक लांडे यांच्या कपाशीच्या शेतात नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका काळविटाची शिकार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काळविटाच्या पोटाच्या भागाला बंदुकीच्या गोळीच्या आकाराचे छिद्र आढळून आल्याने शिकारीचा संशय बळावला आहे.
नगरसूल : येवला तालुक्यातील वनसंवर्धन क्षेत्र परिसर असलेल्या रेंडाळे येथील अशोक लांडे यांच्या कपाशीच्या शेतात नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका काळविटाची शिकार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काळविटाच्या पोटाच्या भागाला बंदुकीच्या गोळीच्या आकाराचे छिद्र आढळून आल्याने शिकारीचा संशय बळावला आहे. ममदापूर रेंडाळा राखीव संवर्धन क्षेत्र काळविटासाठी प्रसिद्ध आहे. ममदापूर-रेंडाळा रस्त्यावर एक दीड महिन्यांपूर्वी भरदिवसा रस्त्यावर याच प्रकारे काळवीटचा हत्या झाली होती. त्यावेळेही वाहनाने शिकारी फरार होण्यात यशस्वी झाले होते. आताही पुन्हा एकदा शिकार झाल्याने यामागे मोठी टाेळी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वन्यजीव संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण आहेर यांना सदर घटनेची माहिती कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व येवला येथील वन अधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली. वनविभागाकडून पुढील कार्यवाही सुरू असून, चौकशी केली जात आहे. दरम्यान, सदर शिकारी हे सराईत असले पाहिजे. रेंडाळा परीसरात अज्ञात वाहनांची वर्दळ नेहमी दिसते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
कोट....
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ममदापूर, रेंडाळा, राजापूर, देवदरी, खरवंडी, कोळगाव, भारत, कोळम गावांतील तरुणांना संघटित करून वन्यजीव संरक्षण समिती स्थापन केली होती. त्यानुसार, त्यांचे ग्रुप तयार करून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात नेहमी विचार विनिमय होत होता. आता तसा विचारविनिमय होत नाही. त्यामुळे परिसरात वन्यजीव धोक्यात आले आहेत.
- प्रवीण आहेर