अनाथाची ‘नाथ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:33 AM2019-03-08T11:33:16+5:302019-03-08T11:34:22+5:30
जेमतेम दोन महिने वय असताना आई-वडिलांनी पंढरपूरच्या नवरंग बालकाश्रमाच्या बाहेर ठेवून पोबारा केला, वृत्तपत्रातून प्रसिद्धी देऊन मुलीची ओळख पटविण्याचे ...
जेमतेम दोन महिने वय असताना आई-वडिलांनी पंढरपूरच्या नवरंग बालकाश्रमाच्या बाहेर ठेवून पोबारा केला, वृत्तपत्रातून प्रसिद्धी देऊन मुलीची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले, परंतु कोणताही प्रतिसाद नातेवाईक, समाजाकडून मिळाला नाही. अशावेळी बालकाश्रम हेच घर व तेथील व्यक्ती हेच नातेवाईक, मित्र-मैत्रीण असे समीकरण तयार झाले ते आजवर कायम आहे. रक्ताचे नाते कोणाशीही नसताना नाव, गाव तरी कोठून मिळणार? परंतु बालकाश्रमानेच नाव दिले ‘आरती अंजली माने’ आणि तीच ओळख कायम राहिली अगदी शिक्षण, लग्न व नोकरीस लागेपर्यंत. अनाथ म्हणून जन्मास आलेल्या आरती या सध्या नारी विकास संस्थेत अधीक्षिका म्हणून कार्यरत असताना त्यांच्या प्रमाणेच अनाथ म्हणून समाजात वाढलेल्यांच्या ‘नाथ’ म्हणून कार्य करीत आहेत. बेवारस, अनाथ अशा समाजानेच एकेकाळी नावे ठेवलेल्या आरती यांनी मात्र संघर्ष व जिद्द कायम ठेवत शिक्षण पूर्ण केले. नांदेडच्या सुमन, पुण्याच्या सेवाग्राम अशा विविध अनाथाश्रमात राहून वयाची अठरा वर्षे पूर्ण केली. अज्ञान असल्यामुळे अनाथाश्रमातील स्वत:ची कामे स्वत: करून शिक्षण घेणाऱ्या आरतीने नंतर बारामती येथे एका रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी पत्करली व त्यातून तिचा व्यक्तिगत खर्च भागविला, याचदरम्यान लग्नाचे वय झाल्याने तिने नांदेडच्या आश्रमात जाऊन लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली व वृत्तपत्रातून जाहिरात देऊन योग्य वर शोधण्यास सुरुवात झाली. अनेकांनी आरतीला निव्वळ अनाथ म्हणून नाकारले, पण त्यातही औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील एका ब्राह्मण समाजाने स्थळाला पसंती दर्शविली. मुलगा नाशिकच्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर असल्याचे सांगून लग्न लावून घेतले. ब्राह्मण समाजात मुली नसल्यामुळेच अनाथ मुलीला सून केल्याचे समाजात मिरवून घेतले, परंतु प्रत्यक्षात नाशिकला आल्यावर आरतीचे स्वप्न भंग झाले. नवऱ्याला दारूचे व्यसन, नोकरीचा पत्ता नाही व त्यात एक अपत्य कसे सांभाळावे, अशा विवंचनेत असलेल्या आरतीची पावले पुन्हा एकदा अनाथाश्रमाकडे वळाली. नाशिकच्या नारी विकास संस्थेची तिने वाट धरली व स्वत:च्या उदरनिर्वाहाचा मार्ग निवडला. ज्या परिस्थितीतून तिने मार्गक्रमण केले तशी परिस्थिती अन्य कोणावर ओढवू नये म्हणून आरतीने या संस्थेची अधीक्षिका म्हणून नोकरी सुरू केली, परंतु त्याचबरोबर गावोगावी जाऊन तरुण मुलींना स्वबळावर उभे करण्याबरोबरच नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी जनजागृतीचे काम हाती घेतले आहे.