करवाढीविरोधी सर्वपक्षीय लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:30 AM2018-02-24T01:30:47+5:302018-02-24T01:30:47+5:30
महापालिकेने मिळकत करात केलेली जबर दरवाढ ही नाशिककरांवर अन्याय करणारी असल्याने त्याविरोधात लढा उभारण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची एकत्रित मोट बांधण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, सर्वपक्षीयांच्या वतीने महापालिकेवर मोर्चा आणण्याबरोबरच कायदेशीरदृष्ट्याही लढाईची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नाशिक : महापालिकेने मिळकत करात केलेली जबर दरवाढ ही नाशिककरांवर अन्याय करणारी असल्याने त्याविरोधात लढा उभारण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची एकत्रित मोट बांधण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, सर्वपक्षीयांच्या वतीने महापालिकेवर मोर्चा आणण्याबरोबरच कायदेशीरदृष्ट्याही लढाईची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिकेने केलेल्या करवाढीविरोधात राजकीय पक्षांकडून आंदोलने सुरू झाली आहेत. परंतु याप्रश्नी गटागटाने लढाई लढण्याऐवजी सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्याविरोधात उभे राहण्याची गरज असल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले. त्यानुसार, सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी आपण चर्चा करणार असून, आंदोलनाची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. महासभेत करवाढीचा प्रस्ताव सादर झाला त्यावेळी सत्ताधारी भाजपातूनही बोटावर मोजण्याइतक्याच लोकांनी या करवाढीचे समर्थन केलेले आहे. त्यामुळे या करवाढीला भाजपातील अनेक नगरसेवकांचा विरोध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ दबावापोटी त्यांना आपला विरोध प्रकट करता आला नसावा. त्यामुळे या सर्वपक्षीय लढ्यात सत्ताधारी भाजपातील सदस्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन बोरस्ते यांनी केले. दरम्यान, स्थायी समितीने करवाढीचा प्रस्ताव महासभेवर धोरणात्मक निर्णयासाठी पाठविला असताना आयुक्तांकडून त्यात परस्पर सुधारणा करून तो महासभेवर आणण्यात आला आहे. त्याबाबतही कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या जात असून, प्रसंगी कायदेशीर लढाई करण्याची तयारी असल्याचे बोरस्ते यांनी म्हटले आहे.
शहराध्यक्षांशीही चर्चा
करवाढीविरोधी होणाºया आंदोलनाबाबत भाजपा शहराध्यक्षांशीही चर्चा करून त्यांना आवाहन केले जाणार आहे. तत्पूर्वी, महापौरांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना बोलावून या करवाढीबाबत पुनर्विचार करावा, अशी विनंती केली जाणार आहे. या करवाढीची वस्तुस्थिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती केली जाणार असल्याचेही अजय बोरस्ते यांनी सांगितले.