पावसाची ओढ अन् दाटले चिंतेचे ढग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 01:40 AM2021-07-05T01:40:13+5:302021-07-05T01:41:07+5:30
जिल्ह्यासह सर्वदूर पावसाने ओढ दिली आहे. यामुळे बळीराजासह सजीवसृष्टी चिंतातुर झाली असून, मृग, आर्द्रा या नक्षत्रांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. सोमवारपासून (दि.४) नक्षत्र बदलत असून, ‘पुनर्वसू’ नक्षत्राचे वाहन असलेले उंदीर तरी दिलासा देऊन जाणार का, असा प्रश्न आता सर्वांच्याच मनात उठत आहे.
नाशिक : जिल्ह्यासह सर्वदूर पावसाने ओढ दिली आहे. यामुळे बळीराजासह सजीवसृष्टी चिंतातुर झाली असून, मृग, आर्द्रा या नक्षत्रांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. सोमवारपासून (दि.४) नक्षत्र बदलत असून, ‘पुनर्वसू’ नक्षत्राचे वाहन असलेले उंदीर तरी दिलासा देऊन जाणार का, असा प्रश्न आता सर्वांच्याच मनात उठत आहे.
यंदा शंभर टक्क्यांपेक्षा अधिक मान्सूनचा वर्षाव होईल, असा मान्सूनपूर्व अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेल्यानंतर, सर्वांनाच तात्पुरता का होईना दिलासा मिळाला. मान्सूनचे राज्यात वेळेवर आगमन झाले अन् शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. शहरासह जिल्ह्यात ५ जून रोजी पावसाने जोरदार सलामी दिली. यामुळे यंदा हवामान खात्याचा अंदाज पूर्णत; खरा ठरणार असल्याचे चित्र दिसत होते, तसेच मान्सूनपूर्व सरीही दमदार बरसल्याने शेतकऱ्यांकडून मशागतीच्या हालचाली गतिमान करण्यात आल्या. खरिपाच्या पेरणीचाही बहुतांश ठिकाणी बळीराजाने ‘श्रीगणेशा’ केला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ हे तीन तालुके वगळता, अन्य तालुक्यांमध्ये फारसे समाधानकारक पर्जन्यमान अद्याप तरी राहिलेले आकडेवारीवरून दिसत नाही. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक कमी केवळ १० मिमी इतका पाऊस येवला आणि नांदगाव तालुक्यात नोंदविला गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ५३८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. शहरात आतापर्यंत या हंगामात केवळ १०१.१ मिमी इतका पाऊस पडला आहे, तसेच जिल्ह्यात १ हजार ७३१ मिमी इतका पाऊस पडला आहे. शहरात १ जून रोजी २३ तर १९ जून रोजी सर्वाधिक २७.३ मिमीपर्यंत इतका पाऊस पडला होता.
पावसाने अचानकपणे विश्रांती घेतल्यामुळे सर्वदूर चिंतेचे ढग दाटले असून, बळीराजासह सर्वांनीच आकाशाकडे नजरा लावल्या आहेत. मात्र, मान्सूनला अनुकूल अशी स्थिती अद्यापही राज्यात निर्माण होत नसल्याने पावसाचे ढग दाटणार तरी कधी, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.