अपार्टमेंटमध्ये दुर्मीळ ‘पहाडी तस्कर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:27 AM2017-10-31T00:27:01+5:302017-10-31T00:27:07+5:30
येथील पाथर्डी फाटा परिसरात एका अपार्टमेंटच्या वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या मोटारीच्या चाकाजवळ वेटोळे घालून बसलेल्या अवस्थेत दुर्मीळ पहाडी तस्कर जातीचा सर्प रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आढळून आला.
नाशिक : येथील पाथर्डी फाटा परिसरात एका अपार्टमेंटच्या वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या मोटारीच्या चाकाजवळ वेटोळे घालून बसलेल्या अवस्थेत दुर्मीळ पहाडी तस्कर जातीचा सर्प रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आढळून आला. घरातील रहिवाशांनी जेव्हा बाहेरील बल्ब सुरू केला तेव्हा गाडीच्या चाकाजवळ साप बसलेला असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी त्या सापाला कुठल्याही प्रकारे असुरक्षितता निर्माण होईल, असे कृत्य न करता सावधगिरीने प्रसंगावधान राखत सर्पमित्र संस्थेशी संपर्क साधला. दरम्यान, काही वेळातच सर्पमित्र त्या ठिकाणी पोहचले व त्यांनी सुरक्षितरीत्या सापाला रेस्क्यू केले. यावेळी सदर साप हा पहाडी तस्कर जातीचा असल्याचे लक्षात आले. हा साप फारसा आढळून येत नाही. यामधील तस्कर हा साप सहसा मोकळ्या पटांगणात अथवा अडगळीच्या ठिकाणी आढळतो; मात्र पहाडी तस्कर हा तसा दुर्मीळ सर्प असून शहरी भागात अपवादानेच दिसून येतो. ग्रामीण तसेच जंगलाच्या परिसरात हा सर्प आढळतो.
सध्या बदलत्या वातावरणामुळे जमिनीखाली उष्णता अधिक वाढत असल्याने सर्प बिळांमधून बाहेर येण्याचे प्रमाण वाढल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. या महिनाभरात सुमारे ४७ पेक्षा अधिक सर्प रहिवासी भागातून ‘रेस्क्यू’ करत नैसर्गिक अधिवासात मुक्त केल्याची नोंद आहे. नागरिकांनी या हंगामात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.