अपूर्व उत्साहात फ ोडली गोविंदांनी दहीहंडी
By admin | Published: September 7, 2015 12:19 AM2015-09-07T00:19:46+5:302015-09-07T00:23:52+5:30
जल्लोष : काही मंडळांची सामाजिक बांधिलकी; तर कोठे पाण्याची उधळपट्टी
नाशिक : गोविंदा आला रे..., मच गया शोर सारी नगरी रे..., गो-गो गोविंदा.., यासारख्या गीते डीजेमधून वाजवत शहरात गोविंदांच्या पथकाने गोपाळकाला अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी पारंपरिक पद्धतीत जल्लोषात साजरी केली. पंचवटी, जुने नाशिक, सिडको, सातपूर, नाशिकरोड परिसरात काही सार्वजनिक मित्रमंडळांच्या गोविंदासह पथकांनी उत्साहात दहीहंडी फोडत गोपाळकाला साजरी केली.
संध्याकाळी पाच वाजेपासूनच शहरासह उपनगरीय भागांमध्ये ठिकठिकाणी विविध मंडळांनी एकत्र येत दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी काहींनी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या वेदनांची जाणीव ठेवत पाण्याचा अपव्यय टाळण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी खासगी जलवाहिन्यांचे पिण्याचे पाण्याचे टॅँकर खरेदी करून पाण्याची उधळपट्टी करत दहीहंडी साजरी केल्याचे चित्र दिसून आले.
पंचवटी येथील मालवीय चौकातील संत ज्ञानेश्वर मित्रमंडळाच्या वतीने संध्याकाळी दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. तसेच शंभू राजे मित्रमंडळाच्या वतीने दिंडोरी रोडवरील लोकसहकारनगरमध्येही संध्याकाळी पाच वाजता दहीहंडीचा उत्सव रंगला होता. श्रीकृष्णनगर मित्रमंडळाच्या वतीने कृष्णनगर चौकात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. जुन्या नाशकातील नानावली चौकातील सिद्धेश्वर मित्रमंडळाच्या वतीनेदही हंडीचा महोत्सव साजरा के ला. यावेळी मंडळाच्या गोविंदा पथकाने चार थर रचत दहीहंडी फोडली. यावेळी चार थर गोविंदांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गणेश सूर्यवंशी, संदीप सांगळे, विशाल कु दळे, सागर बेदरकर, विकी जगताप, दीपक साळी आदिंनी सहभाग घेतला होता.
पंडित कॉलनी येथील माहेश्वरी विद्यार्थी भवनाच्या आवारातही गोविंदांनी तीन ते चार थर रचत दहीहंडी उत्साहात फोडली. गंगापूररोडवरील शंकरनगर परिसरातील साईबाबा मंदिराच्या आवारात परिसरातील युवकांनी एकत्र येत दहीहंडी फोडली. भाभानगरला अजिंक्यतारा प्रतिष्ठानच्या वतीनेही जल्लोषात दहीहंडी फोडण्यात आली. (प्रतिनिधी)