नाशिकमध्ये आता अमरधाममध्येही बुकिंगसाठी ॲप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:15 AM2021-05-07T04:15:58+5:302021-05-07T04:15:58+5:30
नाशिक : कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी वेटींग करावे लागते. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने आता खास ...
नाशिक : कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी वेटींग करावे लागते. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने आता खास ॲप तयार केले असून त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईंकांना स्मशान भूमीतील ताजी स्थिती कळेलच परंतु टाईम स्लॉटदेखील निवडता येणार आहे. गुरुवारी (दि.६) मध्यरात्रीपासून हे ॲप कार्यान्वित रकण्यात आले आहे. शिवाय महापालिकेच्या इ कनेक्ट ॲपमध्येदेखील त्याची लिंक देण्यात आली आहे.
नाशिक आणि पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी वेटींग असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यानंतर अन्य ठिकाणी देखील प्रतीक्षा असली तरी शहरातील अनेक अमरधामबाबत नागरिकांना माहिती नाही. शहरात एकूण २७ अमरधाम असून त्यात ९० बेड आहेत. त्यामुळे त्याचा देखील वापर होऊ शकतो.
नाशिक शहरातील नाशिक आणि पंचवटी अमरधाम शिवाय अन्य स्मशानभूमीतील ताजी स्थिती कळावी इतकेच नव्हे तर त्यांना आगाऊ बुकिंग करता यावे यादृष्टीने महापालिकेने वेब ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.
महापालिकेच्या www.cremation.nmc.gov.in या पोर्टलवर त्याची लिंक आहे. शिवाय महापालिकेच्या इ कनेक्ट या ॲपला देखील ते जोडण्यात आले आहे. त्याचा वापर करून नजीकच्या अमरधाम मधील सद्यस्थिती जाणून घेता येईल व ॲप मध्ये आवश्यक माहिती भरून त्याना पाहिजे त्या विभागातील अमरधाम येथील टाईम स्लॉट बुक करता येणार आहे. स्लॉट बुक झाल्यानंतर संबंधितांना एक मेसेज येईल व त्या ठिकाणी आपण आपली बुकिंग रिसिप्टसुद्धा डाउनलोड करता येणार आहे.
इन्फो..
मनपाच्या विभागात असलेल्या अमरधाम गुगल लोकेशनच्या माध्यमातून शोधणे सुद्धा सुलभ होणार आहे. ॲपमध्ये त्या भागातील सेवा देणाऱ्या सर्व व्यक्तींचे नाव व मोबाइल नंबर देण्यात आला आहे. ही सुविधा मोफत असून नागरिकांनी या सुविधेचा वापर करावा.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका