संशोधनपर माहिती संकलन करण्याकडे अप्पा टिळक यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:09+5:302021-06-04T04:12:09+5:30
नाशिक : ‘चालता बोलता चमत्कार’ या ना. वा. टिळक यांच्या चरित्रात्मक पुस्तकासाठी माहिती गोळा करणे तसेच संशोधनाच्या अंगाने संकलन ...
नाशिक : ‘चालता बोलता चमत्कार’ या ना. वा. टिळक यांच्या चरित्रात्मक पुस्तकासाठी माहिती गोळा करणे तसेच संशोधनाच्या अंगाने संकलन करीत १०० पेक्षा अधिक लोकांना भेटून माहिती मिळवत अप्पांनी कविता, लेख, पत्रसंकलन केले. आजी, आजोबा, आई, वडील यांच्या साहित्याचे संशोधन करण्याचे कार्य प्रदीर्घ काळ केले. संशोधनपर माहितीचे संकलन करण्याकडे अशोक अर्थात अप्पा टिळक यांचा कल होता, असे प्रतिपादन प्रख्यात प्रकाशक रामदास भटकळ यांनी केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या शब्दजागर व्याख्यानमालेत बोलताना रामदास भटकळ म्हणाले, १९५२ पासून नाशिक येथे माझे येणे होते; पण ते केवळ पुस्तकांसाठी, लेखकांसाठी, सांस्कृतिक, साहित्यिक कामासाठी. अशोक टिळक ऊर्फ अप्पा टिळकांना भेटण्याचा योग हा चिंचोलीस आला. त्यानंतर आमची ‘स्मृतिचित्रे’ या लक्ष्मीबाईंच्या आत्मचरित्राबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. दरम्यानच्या काळात अशोक टिळकांच्या लिखाणावरदेखील त्यांच्याशी चर्चा झाली. ‘स्मृतिचित्रे’ केवळ आवडते पुस्तक न मानता अशोक टिळकांनी या ग्रंथ संपादनात अत्यंत महत्त्वाचे काम केले आहे. ते ‘शांतिसदन’ या पुस्तकात मांडले आहे. ‘शांतिसदन’ या पुस्तकासाठी अशोक टिळकांनी खूप मदत केली. त्यामुळेच ते एक सांस्कृतिक व ऐतिहासिक दस्तऐवज झाले. त्यांचा मिश्कीलपणा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येत असे.
मुक्ताताई टिळक यांनी ‘शांतिसदन’ घर आणि पुस्तक वेगवेगळे आहे. त्यांनी शांतिसदन घरातील काही आठवणी शब्दजागर या कार्यक्रमात सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक सचिव प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय वसंत खैरनार यांनी करून दिला. प्राचार्य डॉ. संगीता बाफना, यांनी आभार मानले. कार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, सहा. सचिव प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी, बाल विभागप्रमुख गिरीश नातू, ॲड. भानुदास शौचे, अर्थ सचिव उदयकुमार मुंगी, वस्तुसंग्रहालय बी. जी. वाघ, डॉ. धर्माजी बोडके, श्रीकांत बेणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या व्याख्यानाने शब्दजागर व्याख्यानमालेचा समारोप करण्यात आला. शुक्रवारी (दि. ४ जून) ‘कोरोनाकाळातील शाळा, ऑनलाइन शाळा-आला आता कंटाळा’ या विषयावर सायंकाळी ६ वाजता ऑनलाइन व्याख्यान रंगणार आहे.
इन्फो
मिश्कील शैलीमुळे वाचनीय
अप्पा टिळक यांची पुस्तके ही त्यांच्या मिश्कील शैलीमुळे वाचनीय झाली आहेत. नाशिकमधील समाजाने टिळक कुटुंबाला आपले मानले. त्यांचे धर्मांतर त्यांच्या कुटुंबापुरते होते, असे सांगून भटकळ यांनी नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई टिळकांच्या साहित्य प्रवासावर आठवणी सांगून प्रकाश टाकला.
फोटो
०३भटकळ