पितृपंधरवड्यात काकस्पर्शाची भासतेय उणीव...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 10:35 PM2021-09-27T22:35:55+5:302021-09-27T22:38:52+5:30

देवगाव, ता.त्र्यंबकेश्वर (तुकाराम रोकडे) : कावळ्यांना पितृपंधरवडा सुरू झाला की, सुगीचे दिवस येतात, परंतु गेल्या काही दिवसांत याच कावळ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने काकस्पर्श दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालला आहे. पक्ष्यांची संख्या कमी होत आहे.

Apparent lack of Kakasparsha in Pitrupandharwad ...! | पितृपंधरवड्यात काकस्पर्शाची भासतेय उणीव...!

पितृपंधरवड्यात काकस्पर्शाची भासतेय उणीव...!

googlenewsNext
ठळक मुद्देपक्ष्यांची संख्या कमी होत असल्याची चिंता

देवगाव, ता.त्र्यंबकेश्वर (तुकाराम रोकडे) : कावळ्यांना पितृपंधरवडा सुरू झाला की, सुगीचे दिवस येतात, परंतु गेल्या काही दिवसांत याच कावळ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने काकस्पर्श दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालला आहे. पक्ष्यांची संख्या कमी होत आहे.

आजच्या आधुनिक युगातही पितरांसाठी नैवेद्य घराच्या कौलांवर, पत्र्यांवरही ठेवले जातात. पिढ्यान् पिढ्या या प्रथा परंपरेचा उलगडा होत नसला, तरी हा पितृपंधरवडा मात्र मोठ्या श्रद्धेने प्रत्येक घरात, तसेच खेड्यापाड्यात आजही कायम पाळला जातो. पितृपंधरवडा व्यतिरिक्त कावळ्यांची कुणालाही फारशी आठवण येत नाही. मात्र, या दिवसांत त्यांची काव काव ऐकण्यासाठी आणि आपण टाकलेल्या नैवेद्यामध्ये कावळ्यांनी चोच लावण्यासाठी त्यांची तासन् तास घरांच्या छतावर वाट पाहिली जाते.
गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसांत आपल्या पूर्वजांना नैवेद्य (घास) ठेवण्याची फार जुनी रूढी-परंपरा जुन्या काळापासून आजही चालत आली आहे. ही परंपरा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मानली जात आहे, तसेच शहरी भागातही ठिकठिकाणी ही परंपरा राखली जाते. या दिवसांत पितरांना अर्थात कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या आवडीचे खाद्यपदार्थ कावळ्यांच्या नावाने वाढण्याची जुनी परंपरा आहे. पितृ पौर्णिमेला या परंपरेचा प्रारंभ होतो आणि पितृ अमावस्येला त्याची सांगता केली जाते.

पितृपंधरवाड्याच्या दरम्यान आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या तिथीनुसार घास देण्याची प्रथा परंपरा असल्याने, या दिवसांत कावळ्यांना अधिक महत्त्व प्राप्त होते. कावळ्याने जर नैवेद्य घेतला नाही किंवा घेण्यास उशीर झाला, तरी घरातील कुणीही माणसे जेवत नाहीत. आजही बऱ्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे. सद्या या कावळ्यांची संख्या कमी झालेली दिसून येते. पितरांच्या घासाला शिवण्यासाठी कावळ्यांना साद घालूनही ते फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे बऱ्याचदा केवळ साकडे घालून जेवण आटोपावे लागते. यावेळी घरातल्या वयस्करांनाही दुःख वाटते.

सुगीचे दिवस
कावळा हा पक्षी इतर वेळी उपद्रवी समजला जातो. इकडे-तिकडे आपले खाद्य शोधणारा, मृत प्राणी खाणारा कावळा सहसा कुणालाच आवडत नाही. त्याचे ओरडणे कर्कश असल्याने त्यांना लोकांकडून तुच्छेतेची वागणूक मिळते. मात्र, याच कावळ्यांना पितृपंधरवडा सुरू झाला की, सुगीचे दिवस येतात, परंतु गेल्या काही दिवसांत याच कावळ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने काकस्पर्श दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालला आहे.

(२७ देवगाव क्रो)

Web Title: Apparent lack of Kakasparsha in Pitrupandharwad ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.