बुद्धिदाता गणरायाला वही आणि पेन अर्पण करण्याचे अंनिसचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 08:47 PM2017-08-24T20:47:54+5:302017-08-24T20:50:05+5:30
चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडे जातांना पेढे, हार, फुले आणले जातात. ते वापरलेही जात नाहीत.
नाशिक : चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडे जातांना पेढे, हार, फुले आणले जातात. ते वापरलेही जात नाहीत. अशा स्थितीत परिवर्तनाची चळवळ म्हणून नागरिकांनी फुले, पेढे नेण्याऐवजी बुद्धिदात्याला एक वही आणि पेन अर्पण केले, तर गरजवंत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होऊ शकेल! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हे आवाहन केले असून, या नव्या चळवळीचा प्रारंभच नाशकातून करण्यात आला आहे.
गणराय हा श्रद्धेचा भाग असल्याने त्याला महाराष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कधीही विरोध केला नाही. मात्र तो परिवर्तनवादी व्हावा आणि लोकमान्य टिळकांनी ज्या वैचारिक प्रबोधनासाठी हा उत्सव सुरू केला, त्याचे खºया अर्थाने स्मरण व्हावे, अशी समितीची अपेक्षा आहे. बदलत्या काळात उत्सव बदलले पाहिजेत, या उद्देशाने १९९७ मध्ये चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. त्यानुसार गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी परिसरातील नदीपात्रात जाणारे निर्माल्य बाजूला काढतानाच विसर्जित गणेशमूर्ती दान करण्याची चळवळ सुरू केली. आता ही लोकचळवळ झाली असून, त्यामुळेच आता पुढील टप्पा म्हणून बुद्धिदाता गणरायाला वही आणि पेन अर्पण करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा शाखेचे कार्यवाह महेंद्र दातरंगे यांनी दिली.