अंत्योदय लाभार्थ्यांच्या यादीसाठी हरकतींचे आवाहन
By admin | Published: November 18, 2016 11:49 PM2016-11-18T23:49:53+5:302016-11-18T23:47:28+5:30
प्रारूप यादी : रविवारपर्यंत मुदत
नाशिकरोड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय योजनेसाठी वाढीव इष्टांक प्राप्त झाले असून, यापूर्वी या योजनेतील बीपीएल लाभार्थ्यांमधून वाढीव अंत्योदय लाभार्थ्यांची प्रारूप निवड यादी प्रसिद्ध केली आहे. या प्रारूप यादीबाबतच्या हरकती येत्या रविवारपर्यंत लेखी स्वरूपात धान्य वितरण अधिकारी नाशिकरोड यांच्या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन तहसीलदार शर्मिला भोसले यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी नुकतेच वाढीव इष्टांक प्राप्त झाले आहे. त्यानुसार आता १२ हजार २० या अंत्योदय योजनेच्या लाभार्थी शिधापत्रिकांच्या संख्येत २०७९ इतकी वाढ होणार आहे. चार लाख ९१ हजार ७४८ इतक्या प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या असून, त्यामध्ये एक लाख २१ हजार ५५६ इतकी वाढ होणार आहे. त्यासाठी अंत्योदय योजनेत समाविष्ट असलेले बीपीएल लाभार्थी यांच्यामधून वाढीव अंत्योदय लाभार्थींची निवड केली जाणार
आहे. सध्याच्या ५५ हजार बीपीएल शिधापत्रिका धारकांतूनच ही निवड केली जाणार आहे, तर यापूर्वी प्राधान्य योजनेत समाविष्ट नसलेले अप्राधान्य केशरी शिधापत्रकाधारकांतून वाढीव प्राधान्य कुटुंब लाभार्थींची निवड केली जाणार आहे. तसेच आधार क्रमांक, बॅँक खाते व उत्पन्नाचा दाखला असणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)