ऊन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:43+5:302021-04-05T04:13:43+5:30
ऑनलाइन व्यवसायात झाली वाढ नाशिक : कोरोनामुळे अनेक लोक बाहेर पडणे टाळत असल्याने ऑनलाइन व्यवसायांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ...
ऑनलाइन व्यवसायात झाली वाढ
नाशिक : कोरोनामुळे अनेक लोक बाहेर पडणे टाळत असल्याने ऑनलाइन व्यवसायांमध्ये वाढ झाली आहे. अनेक नागरिक आपल्याला हव्या असलेल्या वस्तू ऑनलाइन मागवत आहेत यामुळे या व्यावसायिकांसह माल पोहोचविणाऱ्या तरुणांनाही रोजगार मिळू लागला आहे.
महागाई कमी करण्याची मागणी
नाशिक : मागील काही दिवसांपासून बहुतेक सर्वच वस्तूची दरवाढ झाली असल्याचे महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्र शासनाने महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बँका बंद असल्याने कामे खोळंबली
नाशिक : मागील चार पाच दिवसांपासून बँका बंद असल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. एटीएममधून पैसे मिळत असले तरी इतर कामांसाठी बँकेत जावे लागत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी एटीएम मध्ये पैसे नसल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.
कोरोना रुग्ण स्वत:च गाठतात दवाखाना
नाशिक : रुग्णवाहिकांचे दर वाढल्याने अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण स्वत:च वाहन चालवत रुग्णालयात जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.
कोरोनामुळे विविध वस्तूंची विक्री वाढली
नाशिक : कोरोनाचा प्रसार वाढल्याने पुन्हा ऑक्सीमीिर, थर्मामीटर आदी वस्तूंची विक्री वाढली आहे. अनेक नागरिकांकडून या वस्तूंची खरेदी केली जात असून स्वत:ची काळजी घेतली जात आहे.
ग्रामीण भागात रुग्ण वाढल्याने चिंता
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळून आल्याने काही ठिकाणी त्याचा शेतीकामांवर परिणाम जाणवू लागला आहे.
कांदा दर घसरल्याने नाराजी
नाशिक : कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर्षी कांदा उत्पादनाचा खर्च वाढला आहे. मात्र भाव खूपच कमी झाल्याने शेतकऱ्यांना कांदा उत्पादन परवडेनासे झाले आहे.
रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
नाशिक :जुना सायखेडा रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रात्रीच्यावेळी अंदाज न आल्याने अनेकवेळा वाहने खड्ड्यात आदळतात यामुळे छोटे-मोठे अपघातही होतात. या रस्त्याच्या दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.
औद्योगिक वसाहतीत रस्त्यांची दुरवस्था
नाशिक : शहरातील औद्योगिक वसाहतीमधील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या परिसरात दिवसरात्र कामगारांची वर्दळ असते. नादुरुस्त रस्त्यांमुळे कामगारांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो या परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी कामगारवर्गाकडून करण्यात येत आहे.
शासनाच्या निर्णयाचे पालकांकडून स्वागत
नाशिक : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात पाठविले जाणार असल्याच्या निर्णयाचे पालकांकडून स्वागत करण्यात येत आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने परीक्षांबाबत चिंता व्यक्त केली जात होती.
फूल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे विवाह सोहळ्यांवर निर्बंध आल्याने विविध व्यवसायांवर विपरीत परिनाम झाला असून फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. लग्नसराईत फुलांना चांगली मागणी असते, मात्र यंदा मागणी घटली आहे.