द्राक्ष उत्पादकांना जागरूकतेने व्यवहार करण्याचे आवाहन
By Admin | Published: January 22, 2015 12:30 AM2015-01-22T00:30:44+5:302015-01-22T00:30:55+5:30
द्राक्ष उत्पादकांना जागरूकतेने व्यवहार करण्याचे आवाहन
वणी : दिंडोरी तालुक्यातील काही भागात द्राक्ष खरेदीसाठी परप्रांतीय व्यापारी डेरेदाखल झाले असून, त्यांच्याकडून द्राक्ष खरेदीही सुरू झाली आहे. मात्र हंगामाच्या अंतिम टप्प्यात द्राक्षाचे पैसे न देता पोबारा होण्याचे प्रकार घडल्याने द्राक्ष उत्पादकांनी जागरूकतेने द्राक्षविक्रीचा व्यवहार करण्याचा सूर उत्पादकांत उमटत आहे.
दिंडोरी तालुक्यात शेकडो एकर द्राक्षबागा असून, सदर नगदी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतोे. द्राक्षलागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रचंड द्राक्षे तालुक्यात उत्पादित होतात. यात काही निर्यातक्षम द्राक्षे उत्पादित करणारे उत्पादकही आहेत. निर्यातक्षम द्राक्षे खरेदी करणाऱ्या निर्यातदारांचा पारदर्शी व्यवहारप्रणालीचा नावलौकीक आहे. त्यामुळे अशा उत्पादकांचे पैसे बुडण्याची भीती कमी मात्र देशांतर्गत द्राक्षे खरेदी-विक्रीच्या व्यवहारात हा धोका जास्त आहे. चढ्याभावाचे आमिष दाखवून द्राक्षेखरेदी करणे, भाव ठरविताना एक भाव सांगणे व पैसे देताना कमी भावाने पैसे देणे तसेच रोख व्यवहाराची हमी देणे मात्र वेळोवेळी पैसे देण्याचे वायदे करणे किंवा उत्पादकांची अडवणूक करणे व द्राक्षे खरेदीच्या अंतिम टप्यात पैसे न देता द्राक्षे खरेदी करून पलायन करणे अशा प्रकारांना प्रतिवर्षी उत्पादकांना सामोरे जावे लागते व उत्पादकांची फसवणूक होऊन आर्थिक कोंडी होते. परप्रांतीय व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवून उत्पादक व्यवहार करतात. या व्यवहाराची लिखापढी नसते. तोंडी झालेल्या व्यवहारामुळे याला कायदेशीर आधार नसतो. याचाच गैरफायदा असे व्यापारी घेत फसवणूक करतात. फसवणुकीची तक्रार पोलिसात दिल्यानंतर पोलीस व्यापाऱ्याची पूर्ण माहिती विचारतात; मात्र उत्पादकाला व्यापाऱ्याने दिलेली माहिती पोलिसांना दिली ती खोटी असल्याचे पुढे येते. असे प्रकार घडले आहेत व याची पुनरावृत्तीची शक्यता आहे. हे सर्व माहीत असतानाही उत्पादक नाइलाज म्हणून व्यवहार करतात. कारण शासनाचे अशा व्यवहारावर
नियंत्रण ठेवण्याची विशेष प्रणाली नाही त्यामुळे फसवणुकीच्या मालिकेला पूर्णविराम मिळत नाही. यातून
मार्ग काढून उत्पादकांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)