श्रद्धांजलीचे फलक न लावण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:14 AM2021-05-09T04:14:43+5:302021-05-09T04:14:43+5:30
कोविड संसर्गाच्या काळात अनेकांनी धास्ती घेतलेली आहे. अशा वेळी कोणाचेही मनोधैर्य खचेल, असे श्रद्धांजलीचे होर्डिंग्ज न लावण्याचे आवाहन करण्यात ...
कोविड संसर्गाच्या काळात अनेकांनी धास्ती घेतलेली आहे. अशा वेळी कोणाचेही मनोधैर्य खचेल, असे श्रद्धांजलीचे होर्डिंग्ज न लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनासह इतर आजाराने मृत्यू पावलेल्या आप्तांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे नातेवाईक, मित्र रहदारीच्या रस्त्यांवर श्रद्धांजलीचे बोर्ड्स किंवा फ्लेक्स लावत असतात. होर्डिंग लावणाऱ्या व्यक्तींचा हेतू भावनिक असला तरी सध्या नकारात्मकतेचे वातावरण पसरले असताना ते पाहणाऱ्या नागरिकांच्या मानसिकतेवर मात्र विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे शहरात भावपूर्ण श्रद्धांजलीचे होर्डिंग्ज न लावण्याचे आवाहन सुरगाणा नगर पंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. मृतांची संख्या जास्त असल्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या होर्डिंग्जची संख्याही वाढली असून रहदारीच्या ठिकाणी असे फ्लेक्स बोर्ड नागरिकांचे लक्ष आपसूक वेधून घेतात. असे फलक न लावण्याचे आवाहन सुरगाणा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.सचिन पटेल यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
इन्फो
नातेसंबंधात अडसर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढल्याने शहरातील अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबीयांचेही सांत्वन करण्यासाठीही कोणाला जाता येत नाही. नातेसंबंधातही त्यामुळे अडसर आला आहे. अशा वेळी जवळच्या माणसाला कोरोनाने अकाली हिरावल्याचे दुःख व्यक्त करण्यासाठी त्याचे मित्र, नातलग यांच्याकडून दिवंगतांना इतर मार्गाने श्रद्धांजली वाहिली जाते. रहदारीच्या ठिकाणी होडिंग्ज लावून भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते.