खासगी डॉक्टरांना सेवा पुरविण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 10:33 PM2020-04-02T22:33:09+5:302020-04-02T22:33:32+5:30
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापालिका व शासकीय रुग्णालयाकडे पुरेसे मनुष्यबळ तसेच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे शहरात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांची बैठक गुरुवारी (दि.२) महापालिकेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना सेवा पुरविण्याचे आवाहन करण्यात आले.
मालेगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापालिका व शासकीय रुग्णालयाकडे पुरेसे मनुष्यबळ तसेच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे शहरात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांची बैठक गुरुवारी (दि.२) महापालिकेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना सेवा पुरविण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीसाठी शहरातील ४० डॉक्टरांबरोबरच उपआयुक्त कर रोहिदास दोरकुळकर, नितीन कापडणीस, सामान्य रु ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक किशोर डांगे, हितेश महाले, मनपाचे आरोग्य अधिकारी सायका अन्सारी, डॉ. भीमराव त्रिभुवन, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी आदी उपस्थित होते. यावेळी उपआयुक्त कापडणीस यांनी कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता भासणार आहे. महानगरपालिका प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठ्या प्रमाणावर करित आहे. मात्र शहरात रु ग्ण आढळून आले तर आपल्याकडे मुबलक डॉक्टर नसल्याने, खासगी डॉक्टरांच्या सेवा घेणेशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. महानगरपालिका व शासनाचे सामान्य रु ग्णालय मिळून डॉ. महाले हे एकमेव एम.डी. मेडिसीन डॉक्टर उपलब्ध आहेत. महानगरपालिकेने जीवन हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त पेशंटसाठी आयसोलेशन वॉर्ड निर्माण केलेला आहे. मात्र तेथे भौतिक सुविधा निर्माण केल्या असल्यातरी एम.डी. मेडिसीन, एम.डी. पेडियाट्रिक आणि एम.डी. अॅनेस्थेसिया या प्रकारच्या सुपरस्पेशालिटी डॉक्टरांच्या उपलब्धतेशिवाय ते निरूपयोगी आहे. तसेच डॉक्टरांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था, स्वत:ला क्वॉरण्टाइन करून घ्यावयाचे असल्यास तशी एखादे हॉटेल अधिग्रहित करून घेतल्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची स्वंतत्र व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात येईल असे कापडणीस यांनी स्पष्ट करून सदर आजाराला संस्था म्हणून नाही तर एक शहर म्हणून आपण सर्व सामोरे गेलो तरच त्याला थोपवू शकतो. त्यासाठी डॉक्टरांनी स्वेच्छेने सेवा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी डॉ. किशोर डांगे यांनी महापालिकेमार्फत सर्व प्रकारचे मास्क, ग्लोज, गम बूट आदी आवश्यक साधने पुरवण्यात येतील तसेच इतर सर्व स्टाफही पुरवण्यात येईल, असे स्पष्ट केले.
वैद्यकीय अधिकारी महाले यांनी, शहरात गंभीर परिस्थिती उद्भवल्यास खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा अधिग्रहित करावी लागणार आहे. तथापि, शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकी व देशावरील संकटाचा विचार करून स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून सेवा देण्यास तयार व्हावे. खासगी व्यावसायिकांना महापालिकेकडून सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येईल, असे स्पष्ट केले.