आधी आवाहन, मग कारवाई
By Admin | Published: February 27, 2016 11:39 PM2016-02-27T23:39:09+5:302016-02-27T23:58:57+5:30
सिडकोत उपायुक्त फिरले दारोदार : पाणी बचतीचे केले आवाहन
सिडको : गंगापूर धरणातील पाणीसाठी हा कमी असल्याने मनपाच्या वतीने संपूर्ण नाशिक शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्यास सुरुवात केली आहे. आज मनपा उपआयुक्त दोरपूरकर यांनी अधिकाऱ्यांनाबरोबर घेत सिडको भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन नागरिकांना रस्त्यावर पाणी सांडू नये तसेच पाणी जपून वापरावे, पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन केले. यावेळी नागरिकही अधिकाऱ्यांशी संवाध साधत आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करा, परंतु इतर वेळेस मात्र सुरळीत पाणी द्या, असे सांगत होते. यंदाच्या वर्षी धरणातील पाणीसाठा कमी असल्याने जूनअखेरपर्यंत पाणी पुरणार नसल्याने आत्तापासूनच पाणी कपातीस सुरुवात करण्यात आली आहे. यात सिडको भागात दर सोमवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यावेळी मनपाच्या वतीने त्रिमूर्ती चौक, सरस्वती चौक, खुटवडनगर, बोरूबाबानगर, चाणक्यनगर यांसह परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले. शुक्रवारी दोरपूरकर यांच्यासह विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी, पाणीपुरवठा अभियंता संजय बच्छाव, शाखा अभियंता डी. व्ही. अहिरे यांसह पाणीपुरवठा विभागात कामकाज करणारे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत आज नागरिकांना घरोघरी जाऊन पाणी बचतीचे आवाहन केले असले तरी यानंतरही नागरिकांनी पाण्याचा अपव्यय केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही मनपाच्या वतीने सांगण्यात आले. (वार्ताहर)