बिबट्याच्या दर्शनाने भीती कायम
By admin | Published: December 17, 2015 10:55 PM2015-12-17T22:55:11+5:302015-12-17T22:57:18+5:30
अहिवंतवाडी : परिसरात पिंजरा लावण्याची मागणी
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी परिसरात बिबट्याचा वाढता वावर पाहता वनविभाग या परिसरात अजून किती गुरे शेळ्या व मनुष्यहानीची वाट पाहत आहे, असा सवाल परिसरातून विचारला जात आहे.
मागील पंधरा दिवसांपूर्वी जुना पुणेगाव रस्त्यालगत असलेल्या सुधाकर एकनाथ कड या शेतकऱ्याचे संकरित वासरू बिबट्याने फस्त केले होते व दोन गायींचा पाठलाग केला असता त्या गायी अंबानेर येथील विठ्ठल गायकवाड यांच्या विहिरीत पडल्याने त्या दोन गायींचा जीव वाचला होता. तेव्हासुद्धा वनविभागाने असेच उडवाउडवीचे उत्तर देत आम्ही पिंजरा लावला आहे. ज्या जंगलात अशा प्राण्यांचा वावर आहे अशा ठिकाणी मनुष्याचा वावर वाढल्याने वन्यजीवांनी मनुष्य वस्तीकडे मोर्चा वळवल्यामुळे बिबाट्याच्या हल्ल्यात वाढ झाल्याचे वन अधिकारी सांगत असल्याने सामान्य नागरिकाने न्याय मागायचा कुणाकडे, असा सवाल विचारला जात आहे. बुधवारी अस्वलीपाडाचे आदिवासी, शेतकरी व अहिवंतवाडीचे उपसरपंच शिवाजी पोपट गावित यांच्या पांडाणे शिवारातील गट नंबर बावीसमध्ये पहाटे पाचच्या सुमारास दोन शेळ्या फस्त केल्या. त्यात दिवसभर वन अधिकाऱ्यांशी दिंडोरीला संपर्क साधला असता फोन लागत नव्हता. वन अधिकारी बोरसे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी संध्याकाळी त्यांचा पंचनामा केला. जर सामान्य मनुष्याला अशी समस्या निर्माण झाली तर त्यांनी कोणाकडे संपर्क साधावा याची पूर्ण कल्पना ग्रामस्थांना द्यावी, अशी परिसरातील शेतकऱ्याची अपेक्षा आहे. (वार्ताहर )