‘ट्रोलिंग’च्या दाहकतेचे ‘साधे आहे...’तून दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 01:16 AM2019-11-19T01:16:25+5:302019-11-19T01:16:59+5:30
समाजमाध्यमे हा एक अदृश्य महाराक्षस असून, ‘ट्रोलिंग’ नावाची एक अजस्त्र आणि अक्राळविक्राळ शक्ती त्यात आहे. त्या शक्तीपुढे कोणालाही टिकणे अशक्य असल्याची, कायदा तकलादू असल्याची आणि माणूस हतबल असल्याची जाणीव करून देण्यात ‘साधे आहे इतकेच’ हे नाटक यशस्वी ठरले.
नाशिक : समाजमाध्यमे हा एक अदृश्य महाराक्षस असून, ‘ट्रोलिंग’ नावाची एक अजस्त्र आणि अक्राळविक्राळ शक्ती त्यात आहे. त्या शक्तीपुढे कोणालाही टिकणे अशक्य असल्याची, कायदा तकलादू असल्याची आणि माणूस हतबल असल्याची जाणीव करून देण्यात ‘साधे आहे इतकेच’ हे नाटक यशस्वी ठरले.
राज्य नाट्य स्पर्धेत नाट्यसेवाच्या वतीने साधे आहे इतकेच हे नाटक सादर करण्यात आले. समाजमाध्यमांतून लोक व्यक्त होऊ लागले. मग खूप व्यक्त होत नंतर व्यक्त होण्यासाठी अस्वस्थ होऊ लागले. समाज माध्यमाचा वापर होत, तो कुणाला तरी उद्ध्वस्त करण्याच्या पातळीपर्यंत पोहोचलाय. त्यातील विकृत छळवणुकीचं तंत्र म्हणजे ट्रोलिंग आहे. त्यापुढे सध्याच्या विश्वातील सारी यंत्रणा, माणूसदेखील हतबल असल्याचे चित्रण त्यातून मांडण्यात आले आहे.
व्यवसायाने कन्टेन्ट रायटर असलेल्या क्र ांती पाटील हिने समाजमाध्यमावर व्यक्त होण्यासाठी ब्लॉग हे माध्यम निवडलेले असते. क्रांतीचे ब्लॉग लोकप्रिय होऊ लागल्याने तिचे फॉलोअर्स वाढतात. ती सामाजिक आणि राजकीय मत व्यक्त करू लागते. त्यामुळे तिच्याही नकळत एक विरोधी प्रवाह तिच्याविरुद्ध कार्यरत होतो. आभासी जगातला हा विळखा तिच्याभोवती घट्ट होत जातो. ती प्रतिकार करते आणि ट्रोल होऊ लागते. देवेन कापडणीस यांच्या अत्यंत कसदार आणि बंदिस्त संहितेला दिग्दर्शक धनंजय वाबळे यांनी पुरेपूर न्याय दिला आहे. कृतार्थ कन्सारा यांची प्रकाशयोजना आणि रोहित सरोदे यांचे संगीत संयोजनदेखील प्रभावी होते.
आजचे नाटक - भोवरा
वेळ - सायंकाळी ७ वाजता