चारही उमेदवारांचे अर्ज अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:30 AM2017-08-01T01:30:57+5:302017-08-01T01:31:01+5:30
नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत लवादाकडे प्राप्त चार तक्रारींवर सोमवारी (दि.३१) लवादाने तक्रारदारांच्या बाजूने निकाल देत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांच्यासह सेवक संचालक पदासाठी आलेले अर्ज नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, नंदा सोनवणे यांचे अर्ज अपात्र ठरविले.
शनिवारी (दि.२९) मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांच्या अर्जावर सुरेश डोखळे यांनी लवादाकडे हरकत नोंदविली होती. उमेदवारी अर्जासोबत आपण कुठल्याही अन्य शिक्षण संस्थेचे सभासद नसल्याचे प्रतिज्ञापत्रावर दिलेले असताना ते कादवा साखर कारखान्याच्या रा. स. वाघ शिक्षण संस्थेचे पदसिद्ध संचालक असल्याची हरकत सुरेश डोखळे यांनी घेतली होती. अन्य दोन हरकतींमध्ये अशोक पिंगळे यांनी सेवक संचालक पदासाठी अर्ज केलेल्या नानासाहेब दाते यांच्या विरोधात सेवा कार्यकाळ अवघा ४३ दिवसांचा शिल्लक असल्याने ते निवडणुक नियमावलीनुसार उमेदवारीसाठी अपात्र ठरत असल्याची हरकत घेतली. अशीच हरकत नंदा अशोक सोनवणे व गुलाबराव भामरे यांच्या विरोधात सयाजी पाटील व केशव शिरसाट यांनी नोेंदविली. हा सेवा कार्यकाळ पाच वर्षांपेक्षा कमी राहिल्याने त्यांना अपात्र ठरविण्याबाबत ही हरकत होती. या दोन्ही हरकती निवडणूक निर्णय मंडळाने घटनेचा आधार घेत फेटाळल्या होत्या. त्यामुळे संबंधित तक्रारदारांनी याबाबत लवादाकडे हरकती नोंदविल्या होत्या. त्यावर रविवारी (दि.३०) सुनावणी होऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यावार सोमवारी लवादाकडून निर्णय देण्यात येऊन सुरेश डोखळे, अशोक पिंगळे, नंंदा सोनवणे व गुलाबराव भामरे यांचे अपील लवादाने मान्य करीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे तसेच नानासाहेब दाते, नंदा अशोक सोनवणे व गुलाबराव भामरे यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले.
आपण गेल्या दोन महिन्यांपासून कादवा संचलित रा. स. वाघ शिक्षण संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला असून, बैठकीला जात नाही. तसेच कोणत्याही इतिवृत्तावर स्वाक्षरी केलेली नाही. मात्र आता लवादाने निर्णय दिला असल्याने तो मान्य आहे. या विरोधात न्यायालयात जाणार नाही.
- श्रीराम शेटे, संचालक तथा माजी जिल्हाध्यक्ष राष्टÑवादी कॉँग्रेस