सुरगाणा नगरपंचायत स्वीकृत नगरसेवकपदाचे अर्ज अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 01:16 AM2022-03-24T01:16:28+5:302022-03-24T01:16:48+5:30
सुरगाणा येथील नगरपंचायतीत स्वीकृत नगरसेवक पदाकरिता नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नगरविकास विभागात सादर करण्यात आलेले दोन्ही उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्याने स्वीकृत नगरसेवकपद रिक्तच राहिले आहे.
सुरगाणा : येथील नगरपंचायतीत स्वीकृत नगरसेवक पदाकरिता नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नगरविकास विभागात सादर करण्यात आलेले दोन्ही उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्याने स्वीकृत नगरसेवकपद रिक्तच राहिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजपच्या गटनेत्या रंजना लहरे यांनी सामाजिक कार्यकर्ते रमेश थोरात यांना स्वीकृत नगरसेवक पदाकरिता नामनिर्देशित केले होते तर शिवसेनेचे गटनेते सचिन आहेर यांनी सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र पगारिया यांना नामनिर्देशित केले होते. मात्र या दोन्ही उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र छाननीअंती अपात्र ठरल्याने निवडणूक होऊ शकली नाही. २ जानेवारी २०१०च्या अधिसूचनेनुसार सदर उमेदवार यांनी निकषाची पूर्तता न केल्याने निवडणूक रद्द झाल्याची माहिती तहसीलदार तथा पीठासन अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली. यावेळी नगरसेवक, पोलीस अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कोट...
सदर स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक प्रक्रिया ही खूपच गुंतागुंतीची आहे. या निवडणुकीकरिता स्थानिक पातळीवरच अर्ज सादर करण्याची व्यवस्था करण्यात यावी. अर्ज सादर करतानाच पूर्तता करण्यासंदर्भात नामनिर्देशन सादर करणाऱ्यांना अपूर्ततेविषयी माहिती देण्यात यावी. आदिवासी पेसा क्षेत्रातील गोरगरीब जनता या उच्च विद्याविभूषितेच्या पदवीची पूर्तता पूर्ण करणे जिकिरीचे आहे. त्यामुळे पेसा क्षेत्रातील नगरपंचायत क्षेत्रातील या अटी शासनाने, निवडणूक प्रक्रियेमार्फत शिथिल करण्यात याव्यात.
जयश्री शेजोळे, नगरसेविका, सुरगाणा