बहुचर्चित पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचा बदलीसाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 02:59 AM2022-04-02T02:59:55+5:302022-04-02T03:01:15+5:30
हेल्मेट सक्ती असो वा पेट्रोलपंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय असो, नेहमीच आपल्या निर्णयामुळे वादग्रस्त व चर्चेत राहणारे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पाेलीस महासंचालकांकडे अकार्यकारी पदावर बदलीसाठी अर्ज केल्याचे वृत्त आहे. खुद्द पाण्डेय यांनी याला दुजोरा दिला असला, तरी बदलीमागे अन्य कोणतेही कारण नसून, व्यक्तिगत कारणांसाठी बदलीसाठी विनंती केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक : हेल्मेट सक्ती असो वा पेट्रोलपंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय असो, नेहमीच आपल्या निर्णयामुळे वादग्रस्त व चर्चेत राहणारे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पाेलीस महासंचालकांकडे अकार्यकारी पदावर बदलीसाठी अर्ज केल्याचे वृत्त आहे. खुद्द पाण्डेय यांनी याला दुजोरा दिला असला, तरी बदलीमागे अन्य कोणतेही कारण नसून, व्यक्तिगत कारणांसाठी बदलीसाठी विनंती केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दीपक पाण्डेय यांची दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला थेट विरोधाची भूमिका घेतानाच पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाशी दोन हात करण्याची तयारी केली. या काळात शहरातील गुन्हेगारीने डोके वर काढल्याने त्यांनी गुन्हेगारांविरूद्ध कडक भूमिका घेत मोक्काचे हत्यार उपसले होते.
पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीला कायदेशीर जोड असल्याचे वेळोवेळी सांगून शहरात हेल्मेट सक्ती मोहीम राबविताना प्रत्येक पेट्रोल पंपांवर पोलिसांची नेमणूक करून ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ अशी भूमिका घेतल्याने पेट्रोलपंप चालकांनी त्यांना थेट न्यायालयात खेचले होते. दरम्यानच्या काळात शहरातील गुन्हेगारीविषयी सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून चौफेर टीका होताच पेट्रोल पंपावरून पोलिसांना माघारी बोलावण्याची नामुष्की पोलीस आयुक्तांवर ओढवली होती. दरम्यानच्या काळात पोलीस चौक्यांमध्ये पोलिसांची दारू पार्टी रंगल्याची घटना घडल्यानंतर पाण्डेय यांनी शहरातील ६५ पोलीस चौक्या बेकायदेशीर ठरविल्या होत्या. दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तांनी पुन्हा हेल्मेटच्या विषयाला प्राधान्याने हात घालत दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्याबरोबरच विनाहेल्मेट चालकांना पेट्रोल देणाऱ्या पेट्रोलपंप चालकांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. तर नववर्षानिमित्त स्वागत यात्रा काढणाऱ्या सामाजिक संघटनांना परवानगी नाकारून रोष ओढवून घेतला होता.
गेल्या दोन वर्षांतील आपल्या प्रत्येक निर्णयामुळे राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांशी दोन हात करण्यास सरसावणाऱ्या पोलीस आयुक्तांविरोधात लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे तक्रारीही केल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीचा पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या बदलीशी अर्थ जोडला जात आहे.
n गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वीच आपण पोलीस महासंचालकांकडे अकार्यकारी पदावर बदली करण्यात यावी, असा अर्ज केल्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी कबूल केले आहे. ही बदली मागण्यामागे व्यक्तिगत कारण असून, त्याचा सविस्तर उहापोह आपण बदली अर्जात केल्याचे पाण्डेय यांनी म्हटले आहे.
n या बदली अर्जाचा व आपल्या कारकिर्दीचा कोणताही संबंध नसून, पोलीस आपले कर्तव्य बजावण्यास सक्षम असल्याचे त्याचबरोबर आजवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला वरिष्ठांचा पाठिंबा होता, असा दावाही पाण्डेय यांनी केला आहे.